भाजप, मिंधेंना महाराष्ट्राचा द्वेष, अपूर्ण काम असताना फक्त स्टंटबाजी करता, मग नामकरणे का करीत नाही! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मिंधे आणि भाजप सरकारला मुंबई, महाराष्ट्र फक्त लुटण्यासाठी हवा आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची घोषणा झाली असताना सरकारकडून अंमलबजावणी होत नाही. छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईच्या दि. बा. पाटील विमानतळाचे नामकरणही अजून रखडले आहे. मात्र गोव्याच्या विमानतळाला मनोहर पर्रीकरांचे तर आयोद्ध्येच्या विमानतळाला ‘वाल्मिकी’ नाव दिले. त्यामुळे भाजप-मिंधे महाराष्ट्राचा इतका द्वेष का करतात असा सवाल उपस्थित करीत अपूर्ण काम असताना स्टंटबाजी करता, मग नामकरण का करीत नाही असा टोला आज शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावला.

नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप अपूर्ण असताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज वायुदलाचे सी-2 95 हे विमान धावपट्टीवर उतरवण्यात आले. यावरून आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेत भाजप-मिंध्यानच्या स्टेटबाजीचा समाचार घेतला. वायुदलाचे हे विमान शॉर्ट अँड अनपेव्हड धावपट्टीवर उतरू शकते. असे असताना वायुदलाचे विमान उतरवून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी काय साधले असा सवालही त्यांनी केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजीच करायची होती तर आज लोकार्पण का केले नाही. आमचे सरकार असतांना या विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याची घोषणा करण्यात आली. मग त्याची अंमलबजावणी आतापर्यंत का केली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला. रेल्वेचे अपघात वाढल्याचे समोर येत असताना रेल्वे मंत्री कुठे दिसत नाहीत. ते जर रेल्वेचे काही काम करीत नसले तर किमान नामकरणाचे काम तरी करावे असा टोलाही त्यांनी लगावला.

गायमुख-भाईंदर निविदेवरून सरकार तोंडघशी
राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेले अनेक घोटाळे बाहेर काढल्यानंतर निर्णय बदलण्यात आले. अशाच प्रकारे गायमुख भाईंदर मार्गाची १६ हजार कोटींचे टेंडर काढून फक्त २० दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र हे कामही विशिष्ट कंत्राटदाराला देण्यासाठी प्रयत्न सुरू आल्याचे सांगत घोटाळा उघड केल्यानंतर आता न्यायालयाने सरकारला झापून ही निविदा प्रक्रिया ६० दिवसांच्या मुदतीत राबवावी असे निर्देश दिल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ही एमएमआरडीए खाते असलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चपराक असल्याचे ते म्हणाले.

अदानीची भूक भागल्यानंतरच आचारसंहिता लागेल
कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ८० निर्णय घेण्यात आले. ही घाई लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि मुंबई-महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्यासाठी करण्यात आल्याचा घणाघातही त्यांनी केला. हे काम गेल्या दोन वर्षांत का केले नाही, असा सवालही त्यांनी केला. हे जीएआर अदानीच्या फायद्यासाठी काढल्याचा आरोप करतानाच अदानीची भूक भाजल्यानंतरच आचारसंहिता लागेल असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.