मैत्रिणीच्या चेष्टामस्करीने तरुणीचा घेतला जीव; कोरेगावातील घटनेने खळबळ; मैत्रिणीला अटक

इन्स्टाग्रामवर आलेली तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. मग त्याच्यासोबत चॅटिंग सुरु झाले. हळूहळू हृदयाच्या तारा छेडल्या. मात्र अचानक इन्स्टाग्रामवरूनच त्याच्या आत्महत्येची बातमी समजल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण सातारा जिह्यातील वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे. मात्र, तो कथित प्रियकर ही केवळ फँटसी असल्याचे व आत्महत्या केलेल्या युवतीच्या जिवलग मैत्रिणीनेच चेष्टामस्करीत तिच्या भावनांशी खेळण्याचा हा भयानक ‘उद्योग’ केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मैत्रिणीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कोरेगाव तालुक्यातील एका युवतीने 12 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती, याची काठार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. अकस्मात मृत्यूच्या कारणाबाबत मृत युवतीच्या मोबाईलची तपासणी केली असता, तिच्या इन्स्टाग्राम खात्यामध्ये मृत मुलीचे मनीष नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे व त्यातील मनीषने जीव दिला असल्याचे समोर आले. तसेच तिच्या इन्स्टाग्रामवर शिवम पाटील नावाच्या चॅटमध्ये मनीष याने जीव दिला असल्याचे कळून आल्याने या युवतीने स्वतः जीव दिल्याचे तपासात आढळून आले.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे (सातारा) व सायबरतज्ञ जय गायकवाड यांच्या मदतीने इन्स्टाग्राम कंपनीकडून पोलिसांनी मनीष व शिवम पाटील यांच्या इन्स्टाग्राम खात्याबाबत माहिती घेतली, तेव्हा मनीष, शिवम पाटील यांचे इन्स्टाग्राम खाते हे काठार पोलीस ठाणे हद्दीतील एका मुलीने तयार केल्याचे समोर आले. त्याबाबत मुलीकडे तपास करता ती मृत युवतीची जिवलग मैत्रीण असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या मुलीकडे तपास करताना मृत मुलीच्या इन्स्टाग्राम खात्याकर संशयित आरोपी मुलीने चेष्टामस्करी करण्याच्या हेतूने मनीष या खोट्या नावाचे इन्स्टाग्राम खाते तयार करून मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तसेच मृत मुलीसोबत मनीष या नावाने स्वतःच चॅट करून मृत मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

मृत मैत्रीण ही मनीष याच्यावर प्रेम करू लागल्यामुळे व भेटण्याची व कॉल करण्याची इच्छा धरू लागली. त्यामुळे आपले भांडे उघडे पडेल म्हणून संशयित आरोपी मुलीने शिवम पाटील नावाचे दुसरे खोटे इन्स्टाग्राम खाते तयार केले. त्याच्या मदतीने व मनीष याचे इन्स्टाग्राम खात्यावरून मनीषच्या कडील बोलत असल्याचे दाखवून मनीष हा मृत झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या दुःख वियोगातून 24 वर्षीय अविवाहित युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी मैत्रीणीला अटक केली असून, न्यायालयाने तिला कोठडी दिली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर अधीक्षक आँचल दलाल, उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अकिनाश माने, उपनिरीक्षक नितीन भोसले, सातक, चव्हाण, इथापे, देशमुख, जय गायककाड यांच्या पथकाने केला.