शिवसेनेची मशाल पेटली, परिवर्तनाची लाट येणार! महाअधिवेशनामुळे महाविकास आघाडीला बळ

केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून विद्वेषाचे राजकारण सुरू आहे. ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावातून हुकूमशाही राजवट करणाऱ्यांच्या विरोधात शिवसेनेची मशाल आता पेटली आहे. नाशिक येथील शिवसेनेचे महाअधिवेशन आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले असून महाविकास आघाडीला खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे. नाशिकमधील शिवसेनेचा झंझावात ही परिवर्तनाची लाट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे राज्यात काहीशी राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र होते, पण शिवसेनेने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावन तपोभूमीत आयोजित केलेली काळाराम मंदिरातील महापूजा, गोदातीरावरील महाआरती, महाअधिवेशन आणि सभा या सर्वच सोहळय़ांना नाशिककरांनी तुडुंब प्रतिसाद दिला. शिवसेनेची ताकद दिसली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

जाहीर सभेतून महाराष्ट्र कुणाच्या पुढे झुकणार नसल्याचे केंद्रातील सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगत लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचाच दबदबा

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 तर विधानसभेच्या 35 जागा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ताकद नसल्याचे चित्र रंगवले जात होते. मात्र, नाशिकने दोन दिवस अनुभवलेल्या भगव्या तुफानाने त्यातली हवा काढली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नव्या शिवशाहीकडे

याच अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र मातीचा कलश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या हाती दिला. ही माती राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार असून त्या माध्यमातून नव्या शिवशाहीची बीजे राज्यात पेरली जाणार आहेत.

अधिवेशन आणि जाहीर सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, तर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे यांची तडाखेबंद भाषणे झाली. शिवसैनिकांना स्फुरण आणि पुढच्या लढाईसाठी बळ देणारेच हे सोहळे होते. नाशिकमधील धार्मिक आणि राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या सोहळय़ांसाठी उत्तर महाराष्ट्र विभागीय नेतेपदाचीही धुरा सांभाळत असलेले शिवसेना नेते संजय राऊत आधीपासूनच ठाण मांडून होते. नाशिक शिवसेनेने यशस्वीरीत्या हे शिवधनुष्य पेलले.

अधिवेशनात महाराष्ट्राच्या हिताचे अत्यंत महत्त्वाचे ठराव करण्यात आले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या कटकारस्थानाचा एकमताने निषेध करण्यात आला आणि मुंबई आणि मराठी अस्मितेसाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार शिवसेनेने केला. मराठा आणि धनगर आरक्षणाचा लढा तीव्र झाला असताना या मागणीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण द्यावे असा ठराव करण्यात आला. कामगारांवर अन्याय करणारे कायदे रद्द करा, अशी मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्रातील या धगधगत्या विषयांवर शिवसेनेने ठोस भूमिका घेतल्याने त्याचे स्वागत होत आहे.

महाराष्ट्रधर्म रक्षणासाठी

1994 मध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे महाअधिवेशन नाशिकमध्ये झाले होते. ‘दार उघड बये दार उघड’ अशी साद शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी घातली होती. त्यानंतर 1995 मध्ये शिवसेनेसाठी सत्तेचे दरवाजे उघडले होते. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रधर्म रक्षणासाठी आई जगदंबे दार उघड… अशी साद घालण्यात आली असून ही एक परिवर्तनाची हाक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.