विधान भवनात विजयाच्या शिल्पकारांचे जंगी स्वागत; कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार, यशस्वी, शिवम यांचा विशेष सन्मान

तब्बल 11 वर्षांनंतर टी-ट्वेंटीचे जागतिक विजेतेपद पटकावण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि विजयाचे शिल्पकार असलेल्या हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैसवाल, शिवम दुबे यांच्यासह प्रशिक्षक पारस म्हांब्रे, संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान भवन सभागृहात सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वांचा वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफी, विधान मंडळाचे स्मृतिचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिष्ठत मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  महाराष्ट्र सरकारच्या वतीने हिंदुस्थानी संघाला 11 कोटींचे पारितोषिकही देण्यात आले. त्या आधी ‘वर्षा’ निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

विधान भवनासमोर विजयश्री खेचून आणणारे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैसवाल आणि शिवम दुबे यांचे आगमन होताच ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी विधान भवनात एकच गर्दी झाली होती. या गर्दीतून वाट काढत हे चारही खेळाडू दुपारी चार वाजता मध्यवर्ती सभागृहात पोहोचले आणि सभागृह जल्लोषाने दणाणून गेले. राष्ट्रध्वज उंचावून सभागृहात ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणाही घुमल्या. या विशेष समारंभाला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेच्या उपसभापती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री मंत्री, क्रीडा व युवक कल्याणमंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी चौघाही खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. मुंबईकर आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेले स्वागत आयुष्यभर लक्षात राहील, अशा भावना खेळाडूंनी व्यक्त केल्या.

तर मी सूर्याला संघाबाहेर काढले असते

हिंदुस्थानी संघाचा विजय खेचून आणण्यात सूर्यकुमार यादव याने पकडलेल्या अप्रतिम, आश्चर्यकारक, चित्तथरारक, अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या एकमेवाद्वितीय झेलचा मोठा वाटा होता. सूर्याने घेतलेल्या या एकाच झेलमुळे हिंदुस्थानी संघाचे नशीब पालटले. एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूकडून भारतीय क्रीडाप्रेमींबरोबरच कर्णधार रोहित याच्याही मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे सूर्याने झेल घेतला त्याचे रोहितने कौतुक केलेच, पण त्याने तो अशक्य वाटणारा झेल सोडला असता तर मी त्याला संघाबाहेर काढले असते, अशी गोड कोपरखळी रोहितने मनोगत व्यक्त करताना मारली.

कौतुक जगज्जेत्यांचे आणि पोलिसांचेही 

नवी दिल्लीवरून संध्याकाळी आलेली टीम इंडियाचे मुंबईत मरीन लाईन्स येथे जंगी स्वागत करण्यात आले. खुल्या टपाच्या डबल डेकर बसमधून विजयी ट्रॉफीसह हजारो मुंबईकरांचे अभिवादन स्वीकारले. भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो मुंबईकर मरीन लाईन्सवर उपस्थित होते. जनसागराचा हा लोंढा पाहून टीम इंडियाही मनापासून सुखावली, मात्र या हजारोंच्या संख्येने आलेल्या क्रीडाप्रेमींच्या गर्दीला मुंबई पोलिसांनी मोठ्या खुबीने नियंत्रण केले आणि हा जनसोहळा कोणत्याही मोठ्या समस्येशिवाय सुखरूप पार पडला. त्यामुळे आपल्या मनोगतात सूर्यपूमार यादव याने मुंबई पोलिसांचे कौतुक करत आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही मुंबई पोलिसांना धन्यवाद दिले.