जंक्शन ओव्हलवरील स्टॅण्डला शेन वॉर्नचे नाव

क्रिकेट व्हिक्टोरिया आणि सेंट किल्डा क्रिकेट क्लबने मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावरील एका स्टॅण्डला महान फिरकीवीर शेन वॉर्नचे नाव देत त्याला अभिवादन केले. यावेळी शेन वॉर्नच्या मुली समर आणि ब्रुक, त्याचे वडील कीथ उपस्थित होते. या स्टॅण्डचे नाव बदलण्याची प्रक्रिया आधीपासून सुरू होती. या स्टॅण्डला पूर्वी ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू केविन मरे यांचे नाव देण्यात आले होते. मरेचे नाव आता फिट्झरॉय, मेलबर्न येथील ब्रान्सविक स्ट्रीट ओव्हल येथील एका स्टँडला देण्यात आले आहे. अडीच वर्षांपूर्वी थायलंडमध्ये वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. 2007 मध्ये वॉर्नने निवृत्ती घेतली होती. तो कसोटीत 700 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्याने 708 कसोटी आणि 293 एकदिवसीय विकेटसह आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट केला होता.