आईला शोधण्यासाठी विशेष पथक; वडिलांना बाळाच्या दुधाची काळजी

सहा महिन्यांच्या बाळाला आईचे दूध मिळत नसल्याने हतबल झालेल्या वडिलांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सासऱयाने डांबून ठेवलेल्या पत्नीला हजर करण्याची मागणी पतीने न्यायालयाकडे केली. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पत्नीला हजर करण्याचे आदेश सासऱयाला दिले होते. तरीही पत्नीला हजर न केल्याने बुधवारी न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.

न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आम्ही आदेश देऊनही पत्नीला हजर केले जात नाही. पत्नीचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करावे. या पथकात दोन महिला अधिकारी असाव्यात. या पथकाने बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेऊन तिला हजर करावे, असे आदेश खंडपीठाने दिले. आम्ही ही सुनावणी 11 जून 2024 पर्यंत तहकूब करत आहोत. त्याआधी महिला सापडल्यास तिला न्यायालयात हजर करा, असेही खंडपीठाने पोलिसांना सांगितले आहे.

काय आहे प्रकरण
हे जोडपे कोल्हापूर येथील आहे. पत्नी मूळची राजस्थानची असून ब्राह्मण समाजाची आहे. पती मराठा समाजाचा आहे. एकमेकांवर प्रेम असल्याने 14 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी विवाह केला. या विवाहाला पत्नीच्या घराच्यांचा विरोध होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या जोडप्याला बाळ झाले. फेब्रुवारी 2024 मध्ये आई आजारी असल्याचा निरोप पत्नीला मिळाला. त्यावेळी पती घरात नव्हता. पत्नी आईला बघण्यासाठी गेली ती परतलीच नाही. तेथून तिला राजस्थानला नेल्याची माहिती पतीला मिळाली. पतीने पोलिसांतही याची तक्रार केली. पत्नीचा शोध घेत पती राजस्थानलाही गेला, पण पत्नी सापडली नाही. अखेर पत्नीचा शोध घेण्यासाठी पतीने अॅड. हर्षद साठे यांच्यामार्फत याचिका दाखल केली.