Nagpur News – नागपूरमध्ये स्कूलबस रेल्वे ट्रॅकवर अडकली; लोको पायलटच्या सतर्कतेमुळे 40 मुलं वाचली!

नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. नागपूरमधील एका शाळेची बस रेल्वे क्रॉसिंग दरम्यान रेल्वेट्रॅकवर अडकली. यावेळी बसमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. बसने रेल्वे क्रॉसिंगवर प्रवेश करताच लेव्हल क्रॉसिंगचे गेट बंद झाले आणि 10 मिनिटे बस ट्रॅकवरच अडकली. बससह एक कारही ट्रॅकवर फसली होती. यानंतर एकच गोंधळ उडाला. पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’… तसंच काहीसं घडलं. सुदैवाने लोको पायलटने प्रसंगावधान राखत ट्रोन थांबवली आणि 40 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.

काय घडलं नेमकं?

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीनुसार, नागपूरमधील एका शाळेची बस गुरुवारी 40 विद्यार्थ्यांना घेऊन खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र निवासी वसाहतीकडे चालली होती. यावेळी खापरखेडा येथील लेव्हल क्रॉसिंग करण्यासाठी बस गेटमधून ट्रॅकवर घुसली. मात्र छिंदवाडा-इतवारी एक्सप्रेस येत असल्याने दोन्ही गेट अचानक बंद झाले. यामुळे 10 मिनिटे बस ट्रॅकवर अडकली.

ट्रेनजवळ येताना दिसताच बसमधील मुलं घाबरली आणि आरडाओरडा करू लागली. मुलांचा गोंधळ ऐकून स्थानिकांनी रेल्वे ट्रॅककडे धाव घेतली. ट्रेन थांबवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. काही जणांनी रेल्वेच्या किऑस्कमधील लाल झेंडा उचलून फडकवण्यास सुरवात केली. तर काहींनी रस्त्याच्या कडेला असलेला प्लास्टिकचा बॅरिअर उचलला आणि ट्रॅकच्या मध्यभागी ठेवला.

सुदैवाने छिंदवाडा-इतवारी एक्सप्रेसच्या लोको पायलटला समोर चाललेला सर्व गोंधळ लक्षात आला. लोको पायलटने प्रसंगावधान राखत लेव्हल क्रॉसिंगपूर्वीच ट्रेन थांबवली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. यानंतर लेव्हल क्रॉसिंग गेट उघडून शाळेची बस आणि कारला बाहेर काढण्यात आले. खापरखेडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनाजी झलक यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, रेल्वे सुरक्षा दल याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अभियांत्रिकी विभागाने गेटमनला घडल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरणासाठी बोलावले आहे.