आधीच ऑक्टोबर हीट, त्यात विद्युतवाहिनीला आग लागल्याने वीजपुरवठा खंडित; घोडबंदरवासीयांचा सात तास घामटा

कापूरबावडी ते आनंदनगर या भागात वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युतवाहिनीला आज आग लागल्याने घोडबंदरवासीयांचा सात तास घामटा निघाला. आधीच ऑक्टोबर हीट, त्यात वीजपुरवठा खंडितमुळे ऑफिसला निघायची वेळ असल्याने महिलांची चांगलीच तारांबळ उडाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीज गायब झाली. या भागातील सिग्नल यंत्रणादेखील कोलमडल्याने वाहतूक विभागाची तारांबळ उडाली. त्यामुळे या भागातील रस्त्यावर ट्रॅफिकचा अक्षरशः जांगडगुत्ता झालेला पाहायला मिळाला.

लिफ्ट बंद असल्याने डिलिव्हरी बॉयचे पार्सल गेटवरच
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कासारवडवली, आनंदनगर, वाघबीळ, ग्रीन व्हॅली, प्रेस्टिज व्हॅली, रोजा बेला, पंचामृत, पारिजात, हावरे सिटी अशा मोठ्या गृहसंकुलांना फटका बसला. विशेष म्हणजे बाहेरून जेवणाची ऑनलाइन ऑर्डर देऊनही डिलिव्हरी बॉय लिफ्ट सुरू नसल्याने 15 मजले कोण चढणार या भीतीने इमारतीखालीच ऑर्डर ठेवून जात होते. त्यामुळे नागरिकांना खाली उतरून ऑर्डर घ्यावी लागली. सात तास उलटल्यानंतर संध्याकाळी 4 च्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे एसी आणि कुलर वापरण्याचे प्रमाणदेखील वाढले असून घोडबंदरच्या रहिवाशांनी आज सात तास भारनियमनाचा अनुभव घेतला. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पातलीपाडा येथील मुख्य वीजवाहिनीला आग लागल्याचा प्रकार घडला. याच वाहिनीमधून अर्ध्या घोडबंदरला वीजपुरवठा केला जातो. सकाळी नाश्ता आणि स्वयंपाक बनवण्याची वेळ असल्याने यामुळे गृहिणींचे वेळापत्रकच कोलमडले. फार तर तासाभरात वीजपुरवठा सुरळीत होईल या आशेवर बसलेल्या नागरिकांना अक्षरशः सात तास उकाड्यात काढावे लागले.

अगरबत्तीच्या कारखान्याला आग
ठाण्यातील एलबीएस मार्गावरील वंदना डेपोजवळील भाटिया कंपाऊंडमधील विनित मित्तल यांच्या तनिष्का मायक्रो एन्कास्युलेशन (टी.एम.पी. एल.) प्रा. लि. या अगरबत्ती बनवण्याच्या कारखान्यातील रेड फॉस्फरसच्या साठ्याला सोमवारी दुपारी आग लागली. कारखान्यातील 200 किलो फॉस्फरसच्या साठ्याने पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने विझविण्यात आली असून सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.