नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, लवकरच नवी टोलवसुली यंत्रणा सुरु करणार

महामार्गावरील टोलवसुलीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सध्याची टोल व्यवस्था रद्द करत सॅटेलाइट टोलवसुली यंत्रणा सुरू करण्याची घोषणा गडकरी यांनी शुक्रवारी केली आहे. टोलवसुली वाढवणे आणि टोलनाक्यांवरील गर्दी कमी करणे हा या प्रणालीच्या अंमलबजावणीमागचा उद्देश आहे.

सॅटेलाईट टोलवसुली यंत्रणेमुळे प्रवासाचा वेळ आणि पैशांची बचत होईल. सध्या ही यंत्रणा फक्त निवडक टोलनाक्यांवर होईल. गाडी मालकांच्या बँक खात्यातून त्यांच्या अंतरानुसार शुल्काचे पैसे कापले जातील, असे गडकरींनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) लागू करणार असल्याचे गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तर देताना सांगितले होते. या निर्णयाची अंमलबजावणी आज करण्यात आली.

गेल्या महिन्यात केले होते कार्यशाळेचे आयोजन

GNSS-आधारित प्रणालींवरील भागधारकांशी सल्लामसलत करण्यासाठी 25 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, 7 जून 2024 रोजी ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर करण्यात आला होती. यामध्ये व्यापक औद्योगिक सहभागास आमंत्रित करण्यात आले होते. EOI सबमिट करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2024 होती.

गेल्या वर्षीच दिली होती नव्या प्रणालीची माहिती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने मार्च 2024 पर्यंत ही नवीन प्रणाली लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा गडकरी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच केली होती. या प्रक्रियेबाबत जागतिक बँकेला माहिती देण्यात आली आहे. FASTag लागू झाल्यामुळे, टोल प्लाझावरील सरासरी प्रतीक्षा वेळेत लक्षणीय बचत झाली आहे.