वांग खोऱयात बिबटय़ाचा वृद्ध शेतकऱयावर हल्ला

वांग खोऱयातील वाल्मीक पठारावरील अतिदुर्गम अशा तामीणे (ता. पाटण) येथे रात्री अकराच्या सुमारास कुत्र्याची शिकार करण्यासाठी वस्तीत घुसलेल्या बिबटय़ाने शेडमध्ये झोपलेल्या वृद्ध शेतकऱयावर हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली असून, बिबटय़ाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

आप्पा रासू साळुंखे (वय 75, रा. तामीणे, पाटण) असे जखमी झालेल्या शेतकऱयाचे नाव आहे. या बाबत तामीणेचे सरपंच कैलास साळुंखे यांनी माहिती दिली.

आप्पा साळुंखे हे रात्री जेवण करून घरातील शेडमध्ये झोपले होते. तेथे थोडय़ाच अंतरावर पाळीव जनावरे बांधली होती. रात्री 11च्या सुमारास कुत्र्याच्या वासाने बिबटय़ा मानवी वस्तीत शिरला. बिबटय़ा साळुंखे यांच्या शेडजवळ येताच, सावध झालेली जनावरे मोठमोठय़ाने हंबरू लागली. त्यामुळे आप्पा साळुंखे जागे झाले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक बॅटरीचा प्रकाश समोर मारला असता, त्यांना बिबटय़ा दिसला. मात्र, डोळ्यावर प्रकाश पडताच, बिबटय़ाने त्यांच्या दिशेने झेप घेत हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी साळुंखे यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचे नातेवाईक धावून आले. त्यामुळे बिबटय़ाने धूम ठोकली.

याबाबत तामीणीने सरपंच कैलास साळुंखे यांनी ढेबेवाडी फॉरेस्टमधील हवालदार अमृत पन्हाळे यांना माहिती दिली. वन अधिकारी तातडीने दाखल झाले. त्यांनी जखमी साळुंखे यांना उपचारासाठी दाखल केले.

डोंगरमाथ्यावर वणवा लावण्यात आला होता. यामुळे  गवत जळून गेल्याने भुकेने व्याकूळ श्वापदांनी आता मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळेच वाल्मीक पठारावरील सर्वच गावांत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.