किमती खडय़ांच्या नावाने दगडधोंडय़ाची विक्री; पद्धतशीर चुना लावून लाखो रुपयांची कमाई, नागरिकांना फसविणाऱ्या सहा भामटय़ांना अटक

विविध रंगांचे व आकारांचे नीलम, रुबी, पुष्कराज, ओपल आदी खडय़ांच्या नावाने नागरिकांना दगडधोंडे विकणारी सहा भामटय़ांची टोळी माटुंगा पोलिसांच्या हाती लागली आहे. कोटय़वधी किंमत सांगून हे भामटे नागरिकांच्या माथी पद्धतशीरपणे मार्बलचे दगड मारत होते. त्यांच्याकडून काही खडे पोलिसांनी जप्त केले आहेत.

महागडे खडे विकण्याच्या बहाण्याने सामान्य नागरिकांची फसवणूक करणारी टोळी दादर परिसरात वावरत असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत कदम यांना मिळाली. त्यानुसार कदम, वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अण्णासाहेब गादेकर व पथकाने दादर पूर्वेकडील स्वामिनारायण मंदिर परिसरात किमती खडे विकण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. दरम्यान, सहा जणांची टोळी त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संजूर खान (58), जितेंद्रकुमार ब्राम्हण (50), प्रकाश टेलर (49), शैलेश चव्हाण (45), भालचंद्र तिलोर (47) आणि  इरफान शेख (43) अशी त्या भामटय़ांची नावे आहेत. त्यांच्याकडून काही खडे जप्त करण्यात आले.

खरे सांगून खोटय़ाची विक्री

विविध रंगांचे व आकाराचे नीलम, रुबी, पुष्कराज, ओपल आदी खडे विकण्यासाठी आम्ही लोक शोधतो. कोणी घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना या खडय़ांची कोटय़वधी किंमत सांगतो. प्रत्यक्ष खडे विकताना हातचलाखी करून विविध रंगांचे दगड खरेदी करणाऱयाला द्यायचे, अशी फसवणूक करण्याची पद्धत असल्याचे आरोपींकडून चौकशीत पोलिसांना सांगण्यात आले.