हिंदुस्थानच्या पराभवाची हॅटट्रिक अन् ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

यजमान ऑस्ट्रेलियाने विजयाच्या हॅटट्रिकसह पाच सामन्यांची द्विपक्षीय हॉकी कसोटी मालिका आधीच 3-0 फरकाने खिशात टाकली. दुसरीकडे पाहुण्या हिंदुस्थानी संघाला सलग तिसऱया पराभवाचे तोंड पाहावे लागले. आता उर्वरित दोन कसोटी लढती ही केवळ औपचारिकता असेल.

ऑस्ट्रेलियाने तिसऱया हॉकी सामन्यात हिंदुस्थानवर 2-1 गोलफरकाने विजय मिळविला. जुगराग सिंहने 41 व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानचे खाते उघडले होते, मात्र त्यानंतर जेरेमी हेवर्डने 44 व्या व 49 व्या मिनिटाला गोल करीत ऑस्ट्रेलियाला 2-1 असे आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी होती. याचे सर्व श्रेय हिंदुस्थानी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला जाते. त्याने अनेक पेनल्टी कॉर्नर अडवीत गोलपोस्टपुढे अभेद्य कामगिरी केली. त्यानंतर तिसऱया क्वॉर्टरमध्ये हिंदुस्थानने गोल केला; पण त्यांना ही आघाडी टिकवून ठेवता आली नाही. ऑस्ट्रेलियाने प्रतिहल्ला करीत तीनच मिनिटांत बरोबरीचा गोल केला. त्यानंतर चौथ्या क्वॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आणखी एक गोल करीत आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवीत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. आता उभय संघांमधील चौथा सामना शुक्रवारी होणार आहे.