उन्हामुळे दुधाच्या दरात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. पाणीटंचाई, चाऱयाचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना, काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रतिलिटरचा 29 रुपयांचा दर पुन्हा 27 रुपयांवर आला आहे.
दोन रुपये दर कमी केल्यापासून दूध उत्पादकांना दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक, तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार 34 रुपये दर दिला जात नसल्याने प्रतिलिटरला सात रुपयांप्रमाणे दररोज 15 कोटी रुपयांपेक्षा आर्थिक फटका बसत असल्याने दूध उत्पादक हैराण झाले आहेत.
राज्यात गाईच्या दुधाचे साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत संकलन होत असते. साधारणपणे कमी पाणी उपलब्धता असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात. नगरसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्याने बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे. त्याचा थेट परिणाम दूध व्यवसायावर होताना दिसत आहे. उष्म्यामुळे साधारण तीस ते चाळीस लाख लिटरपर्यंत दुधात घट झाली आहे.
जनावरे जगविण्यासाठी कसरत
राज्यातील 25 जिह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर कोणतीच उपाययोजना नाही. दुष्काळी भागात यंदा छावण्या सुरू केल्या नाहीत, चारा डेपोही उभारले नाहीत. त्याऐवजी चारा उत्पादनावर भर दिला. अनेक भागांत चारा, जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळवताना दूध उत्पादकांची कसरत सुरू आहे. असे असताना दुधाचे दर पाडून दूध व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकरी करत आहेत.