विमानात सिगारेट ओढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

धूम्रपान केल्याने थेट आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर परिणाम होतो आणि मृत्यूचा धोका वाढतो, त्यामुळे धूम्रपान करणे टाळा.

दिल्ली ते मुंबई विमान प्रवासात दम मारो दम केल्याचा प्रकार समोर आला आहे. सहार पोलिसांनी खलील खान या प्रवाशाविरोधात विमानात सिगारेट ओढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे खासगी विमान पंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. बुधवारी विमानाने दिल्लीहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. विमानात एकूण 176 प्रवासी होते. विमान उड्डाण करण्यापूर्वी केबिन क्रूने विमानात धूम्रपान करण्यास मनाई असल्याच्या सूचना दिल्या होत्या. विमान मुंबईच्या दिशेने येत असताना एका केबिन क्रूला विमानातील टॉयलेटमध्ये सिगरेटच्या धुराचा वास आला. याची माहिती लीड केबिन क्रूला देण्यात आली.

खानने विमानातील टॉयलेट मध्ये दम मारो दम केल्यानंतर तो जागेवर येऊन बसला. त्यानंतर केबिन क्रूने खान कडे दम मारो दम केल्याबाबत विचारणा केली. तेव्हा खानने दम मारो दम केल्याची कबुली दिली. विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. तेव्हा खानला ताब्यात घेऊन सहार पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात एअरक्राफ्ट नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला.