कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी लाच मागितली; तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

प्लॉटच्या नोंदींमध्ये फेरफार करुन अपलोड करण्यासाठी 40 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडळ अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते यांचा यामध्ये समावेश आहे. या कारवाईमुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार आणि त्यांचे नातेवाईक यांच्या संयुक्त नावे सावेडी, अहमदनगर येथे 18000 चौरस फुटाचा प्लॉट आहे. सदर प्लॉटचे नगर महानगरपालिका यांच्याकडील शासकीय रेखांकन करून सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरीता 22 स्वतंत्र उपविभागणी केलेली आहे. लोकसेवक भापकर, तलाठी सजा सावेडी यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या 22 प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड केल्याच्या मोबदल्यात 44 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती 40 हजार रुपये लाच रक्कम देण्याचे ठरले. लोकसेविका देवकाते, मंडळ अधिकारी सावेडी यांनी तक्रारदार यांच्याकडून सदर प्लॉटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी 44 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य केले. लोकसेवक भापकर, तलाठी यांच्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 22 प्लॉटचे 11,000 रुपये लाचेची मागणी केली होती.

सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस निरीक्षक ला. प्र.पो.कॉ. सचिन सुद्रुक, पो.कॉ. बाबासाहेब कराड, चालक पो.हे.कॉ.हारुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.