Pune News : धक्कादायक! अल्कोहोल टेस्टसाठी थांबवलं म्हणून महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं; सुप्रिया सुळे संतापल्या

गुन्हेगारीत आघाडीवर असलेल्या पुणे शहरात आणखी एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अल्कोहोल टेस्टसाठी थांबवले म्हणून एका कार चालकाने थेट महिला पोलिसावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. बुधवार चौकात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली आहे. संजय फकिरा साळवे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे वाहतून पोलिसांची शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास बुधवार चौकात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. यादरम्यान आरोपी बाईकवरून चालला होता. आरोपी दारू प्यायल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबवले.

आरोपीला अल्कोहोल टेस्टसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी आरोपीने पोलिसांशी वाद घालत तिथेच पोलीस ठाण्याबाहेर असलेला पेट्रोल डबा घेऊन आला आणि चेकिंग करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर हे पेट्रोल टाकू लागला. हे पाहून महिला पोलीसमध्ये पडल्या असता आरोपीने त्यांच्यावरही पेट्रोल टाकले. त्यानंतर त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आरोपीकडील लायटर न पेटल्याने पुढील अनर्थ टळला.

विश्रामबाग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.