इंदूरमधील बोगस कॉल सेंटरमधून अनेकांची फसवणूक, माटुंगा पोलिसांकडून तिघांना अटक

शेअर मार्केटमध्ये गुंतवा आणि चांगला परतावा मिळवा अशी बतावणी करत नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱया मध्य प्रदेशातील एका बोगस कॉल सेंटरचा कारभार माटुंगा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी तिघा भामटय़ांना बेडय़ा ठोकून विविध साहित्य जप्त केले.

चंद्रशेखर तावरे (56) यांना एका अज्ञाताचा कॉल आला आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती दिली. Profit bull हे ऑप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक  करण्यास सांगितले. तावरे गुंतवणुकीस राजी होताच भामटय़ांनी त्यांना ऍपमध्ये लॉगिन करण्यास सांगून एनएएफटी व यूपीआयद्वारे वेगवेगळय़ा बँक खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडले. तावरे यांनी 8 लाख रुपये भामटय़ांनी सांगितल्याप्रमाणे बँक खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी   पोलिसांत धाव घेतली.

भदोरियाचा बँक खात्यांचा झोल

इंदूरचा असलेला भदोरिया वेगवेगळय़ा ठिकाणी कंपनी स्थापन करायचा. मग त्या कंपनीच्या नावे विविध बँकांत खाते खोलतो. मग बोगस कॉल सेंटरमधून फसविलेल्या नागरिकांचे पैसे त्या बँक खात्यात जमा करायचे. ती रोकड मग मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून अन्य बँक खात्यात वळते करून भदोरिया मुख्य आरोपींना पाठवायचा. तो मीरा रोड येथे कंपनी स्थापन करण्यासाठी मुंबईत आला आणि पोलिसांच्या हाती लागला. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

मुंबई विमानतळ मग इंदूरमध्ये कारवाई

तावरे यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिगंबर पगार तसेच संतोष पवार, मंगेश जऱहाड या पथकाने तपास सुरू केला. ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खात्यांचा अभ्यास करून पथकाने मुंबई विमानतळावर राज बहाद्दूर भदोरिया या भामटय़ाला पकडले. त्यांच्या चौकशीतून एमपीच्या इंदूर येथे बोगस कॉल सेंटर थाटून बसलेल्या अंकित ऊर्फ राजकुमार शिंदे आणि करण बैरागी अशा दोघांना पकडले. पोलिसांनी या भामटय़ांकडून डेबिट व क्रेडिट कार्ड, विविध बँकांचे धनादेश, 19 मोबाईल, 20 सिमकार्ड, लॅपटॉप, तीन लाखांहून अधिक मोबाईलधारकांची माहिती जप्त केली.