चंद्रकांत पाटलांच्या सभेत भाजपा कार्यकर्त्याकडून शेतकऱयाला धक्काबुक्की

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना टेंभुर्णी येथे आयोजित सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शेतकऱयाने हमीभावावर प्रश्न विचारित धारेवर धरले. यामुळे चिडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी भरसभेत शेतकऱयाला धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे माढय़ातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाषण न करताच परत जावे लागले. यापूर्वी, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनाही सकल मराठा समाजाने आरक्षण व शेतमालाचे हमीभाव यावरून गावात प्रवेश नाकारल्याची घटना घडली होती.

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे पदाधिकाऱयांची सभा आयोजित केली होती. या सभेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, रणजितसिंह निंबाळकर, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, माढय़ाचे आमदार बबन शिंदे, दीपक साळुंके, माजी आमदार परिचारक, चेतनसिंह केदार, योगेश बोबडे यांच्यासह महायुतीतील अनेक घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेत सुर्ली येथील शेतकरी संपत काळे यांनी शेतमाल हमीभाव, काद्यांचे दर व मराठा आरक्षण मुद्दय़ावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाब विचारला. यामुळे पदाधिकारी व उपस्थित आजी-माजी आमदारांमध्ये खळबळ उडाली. भरसभेत काळे हे पालकमंत्री पाटील यांना जाब विचारत मोदी सरकारवर टीका करू लागल्याने भाजपच्या संतप्त पदाधिकाऱयांनी गराडा घालत त्यांना धक्काबुक्की केली.