
राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आले. यानंतर आता सिंधुदुर्ग जिह्यातील सेतू सुविधा केंद्रे अर्थात आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याचा ठेका महायुती सरकारने गुजरातमधील कंपनीला दिला आहे. यावरच संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत की, ”राज्यातील महायुती सरकारचं काम गुजरातच्या अधिपत्याखाली चाललंय.”
माध्यमांशी संवाद साधताना वैभव नाईक म्हणाले आहेत की, ”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 सेतू केंद्रांचं टेंडर गुजरातची कंपनी गुजरात इन्फोटेकला देण्यात आलं आहे. या कंपनीने येथे जे आधी कर्मचारी काम करत होते, त्यांना नोकरीवरून काढण्यात आलं आहे. आता कमी पगारात त्यांनी नवीन कर्मचारी कामावर ठेवले आहेत.”
नाईक म्हणाले, ”राज्यातील सगळे उद्योग गुजरातला देण्याचं शासनाचा डाव आहे. येथील सत्ताधारी गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणात काम करत आहेत. यामुळे या विषय आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.”