
प्रयागराज येथील महाकुंभमेळा मौनी अमावस्येच्या अमृत स्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे चर्चेत होता. योगी सरकारचे गैरव्यवस्थापनावरही भाविकांनी संताप व्यक्त केला. तसेच त्रिवेणी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेवरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता या कुंभमेळ्याबाबत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा कुंभमेळा चर्चेत आला आहे.
महाकुंभाच्या आयोजनातून योगी सरकारची तिजोरी भरली आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री राष्ट्रपती यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आणि अनेक व्हीआयपींनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. महाशिवरात्रीपर्यंत अमृत स्नानासाठी भाविकांमध्ये उत्साह होता. महाकुंभात अमृत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज येथे जमले होते. महाशिवरात्रीच्या पवर्णीलाही प्रयागराज येथे प्रचंड गर्दी होती. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी सध्या सुरु असलेल्या महाकुंभावर टीका केली आहे.
माघ महिन्यातील पौर्णिमेलाच महाकुंभ संपला आहे, असे शंकराचार्य म्हणाले. आध्यात्मिक महाकुंभ संपला असल्याने आता सुरू आहे तो सरकारी कुंभमेळा असल्याची टीकाही त्यांनी केली. अध्यात्मिक महाकुंभ संपल्याच्या वक्तव्याला त्यांनी शास्त्राचा आधारही दिला. महाकुंभ तर पौर्णिमेलाच संपला आहे. आता जे काही सुरू आहे, तो सरकारी कुंभमेळा आहे. खरा कुंभमेळा, माघ महिन्यातच असतो. माघ महिन्याची पौर्णिमा तर संपली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून आयोजित कुंभमेळ्यावर त्यांनी टीका केली. पारंपारिक कुंभ मेळ्यासारखे त्याचे आध्यात्मिक महत्त्व नाही, सरकार दावा करत असले तरी त्याचे आध्यात्मिक महत्त्व नाही, असेही ते म्हणाले.