
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. बीड जिल्ह्यातील परळी शहरातील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासावरून सुळे यांनी हे पत्र लिहिले असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
परळी शहरातील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळला आहे. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असून मुंडे कुटुंबाने परळी पोलीस ठाण्यात कार्यरत काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोनचे सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे. ही मागणी योग्य असून त्यावर कारवाई व्हावी म्हणून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात काय?
सुप्रिया सुळे पत्रात म्हणतात की, बीड जिल्ह्यातील परळीचे रहिवाशी महादेव मुंडे यांचे 21 ऑक्टोबर 2023 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेला तब्बल एक वर्ष उलटून गेले तरीही त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असून तपासात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नुकतेच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मी स्व. महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता मुंडे कुटुंबीयांनी आपले म्हणणे मांडले. या कुटुंबाला शासनाकडून न्याय हवा आहे. त्यांनी ‘महादेव मुंडे खून प्रकरणा’चा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली असून हा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी त्यांचे म्हणणे आहे. याखेरीज परळी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सानप, भास्कर केंद्रे, गोविंद भताने आणि विष्णू फड या कर्मचाऱ्यांच्या फोनचे दि. 21 ऑक्टोबर 2023 ते 10 जानेवारी 2024 दरम्यानचे सीडीआर काढले तर या प्रकरणाचा तपास थांबविण्यासाठी कोणत्या बंगल्यावरुन फोन आला. हे प्रकरण दाबण्यासाठी कोणी कोणी फोन केले तसेच खून कोणी केला. यातील आरोपी कोण आणि त्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण हे निष्पन्न होईल असे मुंडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या पद्धतीने कार्यवाही झाल्यास या प्रकरणातील आरोपींना गजाआड करणे शक्य होईल. जेंव्हा हे आरोपी गजाआड होतील तेंव्हा त्यांची नार्को टेस्ट करावी अशीही मुंडे कुटुंबियाची मागणी आहे.
दरम्यान, एवढा प्रदीर्घ काळ रखडलेल्या या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंडे कुटुंबियांनी केलेली ही मागणी योग्य आहे अशी आमची भूमिका आहे. या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून कोणावरही अन्याय होणार नाही याची शाश्वती देण्यासाठी राज्याचे प्रमुख आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून आपण नक्की पुढे याल अशी आम्हाला आशा आहे.
परळी शहरातील ‘महादेव मुंडे खूनप्रकरणा’चा तपास गेली काही महिन्यांपासून रेंगाळला आहे.बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मी मुंडे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी या प्रकरणातील आरोपी अद्यापही तपासयंत्रणांना सापडले नाहीत. यासंदर्भात परळी पोलीस ठाण्यात कार्यरत… pic.twitter.com/tsQUn34iQj
— Supriya Sule (@supriya_sule) February 27, 2025