
पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना बुधवारी समोर आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांनी त्याला फरार घोषित केले असून त्याची पकडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे मिंधे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचे थायलंडला जाणारे विमान तासाभरात हवेतल्या हवेत वळवणाऱ्या पोलिसांचे हात 48 तास उलटून गेल्यानंतरही नराधम गाडेपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वारगेट बस स्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार केल्याचे वैद्यकीय चाचणीतून समोर आले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून जामिनावर बाहेर आला होता. स्वारगेटमध्ये तरुणीवर बलात्कार केल्यापासून तो गायब असून पोलिसांनी फरार घोषित केले आहे. पुणे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांच्या 13 पथकांकडून शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. बुधवारी त्याचा कुटुंबीयांची आणि प्रेयसीचीही चौकशी करण्यात आली. त्याची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी सांगितले.