
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडून 17 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही उलवा येथील सेक्टर 23 मधील भगवती बेलाविस्टा इमारतीवर बिल्डरने मनमानी पद्धतीने लावलेले महाकाय होर्डिंग उतरवले गेले नव्हते. हे होर्डिंग काढण्यासाठी रहिवासी अनेक महिन्यांपासून बिल्डरला विनंती करीत होते. मात्र बिल्डर आपल्या आडमुठ्या भूमिकेवर ठाम होता. शेवटी रहिवाशांनी या मनमानीविरोधात अलिबाग ग्राहक संरक्षण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हे होर्डिंग तातडीने हटवण्याचे निर्देश प्राधिकरणांना दिले. त्यानुसार हा यमदूत सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीने अखेर खाली उतरवला. हे महाकाय होर्डिंग हटवण्यासाठी रहिवाशांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे.
■ भगवती बिल्डरने उलवे येथील सेक्टर 23 मध्ये भगवती बेलाविस्टा ही सात मजल्याची इमारत बांधली आहे. ही इमारत जेएनपीटी मार्गाच्या समोर आहे.
■ बिल्डरने इमारतीवर आपल्या जाहिरातीचे मोठे होर्डिंग लावले होते. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतरही हे होर्डिंग काढण्यात आले नव्हते.
■ हे होर्डिंग हटवण्यासाठी रहिवाशांनी बिल्डरला विनंती केली. मात्र त्याने होर्डिंग हटवण्यास नकार दिला. रहिवाशांनी सिडकोचा दरवाजा ठोठावला. पण कारवाई झाली नाही.
■ या विरोधात रहिवासी शेवटी अलिबाग सत्र न्यायालयात गेले. तिथे शिवसेना उपशहरप्रमुख अॅड. संजय जाधव यांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हे होर्डिंग तातडीने हटवण्याचे आदेश दिले.
बिल्डरांच्या मनमानीला चाप
अनेक बांधकाम व्यावसायिक इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात करण्यासाठी इमारतीवर मोठे होर्डिंग लावतात. या इमारतीमधील सर्व घरे विकल्यानंतर ही इमारत गृहनिर्माण संस्थेच्या ताब्यात दिली जाते. मात्र त्यानंतरही इमारतीवर लावण्यात आलेले होर्डिंग उतरवले जात नाही. मनमानी पद्धतीने ते तसेच ठेवले जाते. मात्र आता अलिबाग ग्राहक न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे बिल्डरांच्या या मनमानीला मोठा चाप लागणार आहे, अशी प्रतिक्रिया उपशहरप्रमुख अॅड. संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.