महाशिवरात्री दिवशी मांसाहार जेवणावरून वाद, दिल्लीतील विद्यापीठात दोन गटात हाणामारी

महाशिवरात्री दिवशी मांसाहारी जेवण दिल्याच्या कारणातून दिल्लीतील विद्यापीठात दोन गटात हाणामारी झाल्याचे समोर आलं आहे. दिल्लीतील साउथ एशियन युनिव्हर्सिटी (एसएयू) येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांनी एकमेकांवर विद्यापीठात हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला.

महाशिवरात्रीच्या दिवशी विद्यापीठाच्या मेसमध्ये मांसाहारी जेवण देऊ नये, अशी एबीव्हीपीची मागणी होती. मात्र एसएफआय सदस्यांनी उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियुक्त केलेल्या मेसमध्ये जबरदस्तीने मांसाहारी जेवण देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एबीव्हीपीने केला आहे.

जेवणाच्या मुद्द्यावरून बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला, मग हाणामारी झाली. यावेळी एबीव्हीपीने एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. पीडित विद्यार्थ्याने पीसीआर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पीडित विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

एबीव्हीपीने मांसाहारी जेवण दिल्याबद्दल मेस कर्मचाऱ्यांवरही हल्ला केल्याचे एसएफआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मारहाणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त विद्यापीठाच्या मेसमध्ये मांसाहारी जेवण देऊ नये या एबीव्हीपीच्या कठोर आणि अलोकतांत्रिक मागणीचे पालन न केल्याने एबीव्हीपीने विद्यापीठाच्या मेसमध्ये साउथ एशियन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांवर क्रूर हल्ला केला. व्हिडिओमध्ये एबीव्हीपीचे गुंड मेसमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करताना आणि त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. हल्ल्यादरम्यान गुंड महिला विद्यार्थ्यांचे केस पकडून त्यांना हिंसकपणे ओढत घेऊन गेले. मांसाहारी जेवण दिल्याबद्दल त्यांनी मेस कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला, असे एसएफआयने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

एसएफआयच्या दाव्याला अभाविपने प्रत्युत्तर दिले आहे. एसएफआय सदस्यांनी उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियुक्त केलेल्या मेसमध्ये जबरदस्तीने मांसाहारी जेवण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एबीव्हीपीने केला आहे.

विद्यापीठात महाशिवरात्रीनिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी उपवास केला होता. धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचा आदर करत, या विद्यार्थ्यांनी मेस प्रशासनाला या खास दिवशी त्यांच्यासाठी सात्विक जेवणाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करून, विद्यापीठ प्रशासनाने दोन मेसपैकी एका मेसमध्ये सात्विक जेवणाची व्यवस्था केली. उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियुक्त केलेल्या मेसमध्ये सात्विक जेवण दिले जात असताना, एसएफआयशी संबंधित लोकांनी जबरदस्तीने मांसाहारी जेवण देण्याचा प्रयत्न केला, असे अभाविपने आपल्या निवेदनात म्हटले आहे.