विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर, लाडक्या बहि‍णींना सुरक्षा कधी देणार? संजय राऊत यांचा सवाल

पुण्यात मोकाट सुटलेल्या गँग्सना कायद्याची भीती राहिलेली नाही. सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना आयुक्तांचे अभय आहे. महिलांवर खुलेआम अत्याचार, बलात्कार होत आहेत आणि गृहखाते राजकीय कार्यासाठी वापरले जात आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर होत असून लाडक्या बहि‍णींना सुरक्षा कधी देणार? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला केला. गुरुवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

स्वारगेट बस डेपामध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेवरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर निशाणा साधला. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील स्वारगेट भागात शिवशाही बसमध्ये घृणास्पद, किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारा प्रकार घडला. लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये दिले म्हणजे तुम्ही तिची अब्रु विकत घेतली का? महिन्याला 1500 दिले म्हणून गुंडांना, विकृतांना बहि‍णींचे वस्त्रहरण करण्याचे लायसन्स दिले का? असा सवाल राऊत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यांना आणि पोलीस आयुक्तांना याचा जाब विचारायला हवा, असेही राऊत म्हणाले.

पुण्यात राजकीय आणि सरकारी वरदहस्ताने गुंडगिरी वाढली आहे. गुंडांना पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं बंद करा. पुण्याच्या हद्दीत राजकीय आश्रयाखाली खंडणीखोरी, हप्तेबाजी, अपहरण आणि गुंडगिरी सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना आयुक्तांचे अभय आहे, असा आरोप राऊत यांनी केला. स्वारगेटला काल शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केले असून आता त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतील, असेही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांना संरक्षण मिळावे आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावे म्हणून शक्ती कायदा तयार करण्यात आला. मात्र आताचे सरकार तो पुढे का नेत नाही हे रहस्य आहे. शक्ती कायदा येऊ नये म्हणून सरकारमध्ये कुणी ‘फिक्सर’ बसले आहे का? हा कायदा आल्यामुळे महिलांचे खून व अत्याचार करून जे लोक मंत्रीमंडळात बसले आहेत त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचतील अशी कुणाला भीती वाटते का? असा सवालही राऊत यांनी केला.

पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित

परिवहन मंत्र्यांनी स्वारगेट बस स्थानकात तैनात 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित केले. यावरही राऊत यांनी परखड शब्दात भाष्य केले. महिलेवर अत्याचार झालेला आहे. अत्याचार झाल्यावर तुम्ही अॅक्शन मोडवर येता, तोपर्यंत काय करता? असा सवाल करत राऊत यांनी बस डेपोंची अवस्था वाईट असल्याचे म्हटले. सामान्य जनता एसटीतून फिरते, पण मंत्री महागड्या गाड्यातून फिरतात. एकही मंत्री सरकारी गाडीतून फिरत नाही. सगळ्यांकडे ऑडी, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू आहे. या गाड्या कुठून आणि कुणाच्या पैशाने आल्या, कुणी भेट दिल्या? असा सवालही संजय राऊत यांनी केला.