हाय सिक्युरिटी नंबरप्लेटच्या नावाखाली वाहनचालकांची लूट, कल्याणमध्ये शिवसैनिकांची आरटीओवर धडक

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटच्या नावाखाली सरकार वाहनचालकांची लूट करत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. नंबरप्लेटसाठी इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा दर आकारले जात असल्याने संतप्त शिवसैनिकांनी आज आरटीओवर धडक देत शुल्क कमी न केल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

■ बनावट नंबरप्लेट लावून होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारी वाहने नेमकी कोणाची आहेत अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबरप्लेटवरून वाहनाची ओळख पटवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होतो.

■ पर्याय म्हणून केंद्र सरकारने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्तीचे पैसे आकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

■ हातावर पोट असणाऱ्या गरीब रिक्षाचालकांना नंबर प्लेटसाठी 500 रुपये आकारले जातात. त्याच नंबरप्लेटसाठी गुजरातमध्ये 200, गोव्यात155, पंजाबात 270 आणि आंध्र प्रदेशात 282रुपये आकारले जातात. मग महाराष्ट्रात जास्त शुल्क का? ही लूट कोणासाठी ? असा सवाल केला आहे.

कल्याण वाहनचालक संघटनांनी आपली व्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे मांडताच विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्यासह शहरप्रमुख सचिन बासरे, उपनेते अल्ताफ शेख, भिवंडी लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख साईनाथ तारे, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष नीलेश भोर यांनी कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी आशुतोष बारकुले यांची भेट घेत नंबरप्लेटचे शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घेण्याचे निवेदन दिले.

आम्ही हाय सिक्युरिटी नंबरप्लेटच्या विरोधात पण केंद्र सरकार महाराष्ट्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आर्थिक वसुलीला आमचा विरोध आहे. राज्याचे परिवहन मंत्री यांनाही पत्र पाठवण्यात आले असून, दर कमी न केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.

■ रुपेश भोईर, विधानसभा सहसंघटक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)