प्लेट खेचल्या, काउंटर फोडले, जेवणासाठी लोक तुटून पडले; ‘ग्लोबल’ इनव्हेस्टर कार्यक्रमात ‘लोकल’ पुरी-भाजीसाठी रेटारेटी

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी ‘मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद’ अर्थात ‘MP Global Investors Summit’ पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेला 60हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्योगपती गौतम अदानी यांनीही या परिषदेला संबोधित केले. 30 लाख कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट असलेल्या ही परिषद मात्र भलत्याच कारणामुळे गाजली.

मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेत जेवणासाठी गोंधळ उडाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या परिषदेतीसाठी उपस्थित लोक जेवणाच्या काउंटवर तुटून पडले. पुरी-भाजीच्या प्लेट्स घेण्यासाठी लोक धडपडताना दिसले. यावेळी लोक एकमेकांना धक्काबुक्की करत होते. काहींनी तर थेट जेवणाचे काउंटरच फोडले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी परिषदेच्या आयोजकांवर हल्ला चढवला.

नेमकं काय घडलं?

भोपाळमध्ये आठवी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट आयोजित करण्यात आली होती. पहिला दिवस शांततेत पार पडला, मात्र दुसऱ्या दिवशी कार्यक्रम स्थळी जेवणाच्या काउंटवर गोंधळ उडाला. लोकांनी प्लेट ओढले, काउंटर फोडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटला हिंदुस्थानातील प्रमुख उद्योजकांसह राजकीय नेतेही उपस्थित राहिलो होते.

काँग्रेसची सरकारवर टीका

दरम्यान, व्हायरल व्हिडीओवर मध्य प्रदेशमधील विरोधी पक्ष काँग्रेसचे माध्यम प्रमुख मुकेश नायक यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने 30 लाख कोटी गुंतवणुकीचा दावा करत आहे आणि दुसरीकडे लोक खाण्यासाठी तुटून पडत आहेत. हा किती विरोधाभास आहे. या परिषदेमध्ये एवढे गरीब लोक आले होते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच या व्हिडीओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे, असेही ते म्हणाले.