
देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत्याही शुल्लक कारणांवरून महिलांना जाचाला सामोरे जावे लागत आहे. अशातच बेंगळुरुमध्येही एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेने दारूसाठी पैसे न दिल्यामुळे एका व्यक्तीने तिच्यावर चाकू हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी उत्तर बेंगळुरूमधील कोथनूर येथे ही घटना घडली. आनंद असे त्या आरोपीचे नाव असून नागालक्ष्मी असे त्या महिलेचे नाव आहे. नागालक्ष्मी ही तिच्या घराच्या बाहेर बसली असताना आनंद तिच्याकडे गेला आणि त्याने नागालक्ष्मीकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र नागालक्ष्मी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आनंदने रागाच्या भरात तिच्यावर चाकू हल्ला केला. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, आरडाओरडा ऐकून नागालक्ष्मीचे शेजारी तिच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.