
चीन एका बाजूला हिंदुस्थानसोबतचे संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे दाखवते तर दुसऱ्या बाजूला सीमेवर छुप्या पद्धतीने हालचाली सुरू ठेवते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून आता चीनने म्यानमार सीमेजवळील नैऋत्य युनान प्रांतात एक अत्याधुनिक रडार प्रणाली स्थापित केल्याचं वृत्त आहे. या अत्याधुनिक रडारमुळे हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि राष्ट्रीय सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंग्रजी वृत्त संकेतस्थळांना मिळालेल्या माहितीनुसार लार्ज फेज्ड अॅरे रडार (LPAR) ची पाळत ठेवण्याची श्रेणी 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे बीजिंगला हिंद महासागराच्या विस्तृत क्षेत्रांवर आणि हिंदुस्थानच्या हद्दीतील अगदी अंतर्गत भागातील हालचाली टिपता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इंडिया टुडे टीव्हीने सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे की या रडार प्रणालीमुळे गुप्तचर माहिती गोळा करण्या चीनच्या क्षमतांमध्ये वाढ होऊ शकते. हिंदुस्थानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून चीन करू इच्छित आहे.
LPAR प्रणाली रिअल टाइममध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण शोधण्याची आणि ट्रॅक करण्याची क्षमता ठेवते. यामुळे चीन हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटासारख्या प्रमुख ठिकाणांवरून होणाऱ्या हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर बारीक लक्ष ठेवू शकते.
अग्नि-5 आणि के-4 सारख्या प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी ही ठिकाणे महत्त्वपूर्ण स्थळे आहेत. क्षेपणास्त्रांचा मार्ग, वेग आणि अंतरांवरील महत्त्वाचा डेटा मिळवून, चीनने स्वत:ची संरक्षण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी उचलेलं हे धोरणात्मक पाऊल आहे.