ट्रम्प यांच्या धमकीनंतर झेलेन्स्की अमेरिकेला भेट देणार, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे येत्या शुक्रवारी अमेरिकेला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी झेलेन्स्की हे अमेरिका दौऱ्यावर येत असल्याची माहिती दिली. दोन्ही देशांमध्ये दुर्मिळ खजिनांसाठी काही करार होणार आहेत. एवढेच नाही तर रशिया-युक्रेन युद्धावरही यावेळी तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे एकामागोमाग एक मोठे निर्णय घेत आहेत. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. याच दरम्यान बुधवारी ट्रम्प यांनी पहिली कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी युक्रेनबाबत मोठे विधान केले. युक्रेनचे ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याचा स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.

कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की वॉशिंग्टनला येणार असल्याची माहिती दिली. झेलेन्स्की यांच्या सहमतीने दोन्ही देशांमध्ये करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये हजारो अब्ज डॉलरचे करार होऊ शकतात. यात दुर्मिळ खजिनांसह अन्य वस्तुंचाही समावेश आहे, असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.

झेलेन्स्की रशियाशी चर्चेसाठी तयार, मात्र पुतिन यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट

ट्रम्प सरकार सत्तेवर आल्यापासून रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांना समोरासमोर चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. याच दरम्यान ट्रम्प सरकार दुर्मिळ खजिनांसाठी युक्रेनवर दबावही टाकत होते. युक्रेनला अमेरिकेची मदत हवी असेल तर 500 अब्ज डॉलर किमतीची दुर्मिळ खजिने द्यावी लागतील अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता याच करारांसाठी झेलेन्स्की अमेरिकेला पोहोचणार आहेत. युक्रेनला या कराराच्या बदल्यामध्ये अमेरिकेकडून सुरक्षेची हमी हवी आहे.

दरम्यान, जगातील एकूण कच्च्या मालाच्या सुमारे 5 टक्के कच्च्या मालाचा पुरवठा एकट्या युक्रेनमधून होतो. युक्रेनमध्ये जवळपास 19 दशलक्ष टन ग्रेफाईटचा साठा आहे. यासह जगातील एकूण साठ्यांपैकी लिथियमचा 33 टक्के साठा युक्रेनकडे आहे. तसेच टायटॅनियम उद्पादनातही युक्रेनचा वाटा 7 टक्के आहे. युक्रेनच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्मिळ खजिनं आहेत. यावर अमेरिकेची नजर आहे.