
मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ तातडीने स्थापन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उद्याच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीने सरकारला यासंदर्भात स्मरणपत्र दिले आहे.
मराठी ज्ञानभाषा करण्यासाठी अपारंपरिक मराठी विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी ही मागणी 1933च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून होतेय. तशी शिफारस राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीकडून सरकारला करण्यात आलेली आहे. मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे तशा अपारंपरिक आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ कायद्याचे प्रारूपदेखील सादर करण्यात आले. मात्र सरकार ते सातत्याने टाळत आहे. मराठी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर तरी सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून आतातरी हे विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली, जेणेकरून मराठी ही आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकासाच्या संधीची भाषा होईल, असे ते म्हणाले.