
गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये उद्या माय मराठी गीतांचे सूर गुंजणार आहेत. मराठी भाषा गौरवदिनी 1 हजारांहून अधिक मराठी गीतांचे सलग सादरीकरण होणार आहे. यात विविध काळातील मराठी चित्रपट व नाटय़गीते, अभंग, भावगीते, भक्तिगीते, लोकगीते आदी मराठी गीते सादर होतील. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी सूर्योदयापासून ते सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्यास्तापर्यंत सलग 1 हजार 12 मराठी गीतांची शृंखला सादर करण्यात येणार आहे.
जोगेश्वरीत मराठी भाषा गौरव दिन
जोगेश्वरी (पूर्व) विधानसभेचे आमदार बाळा नर यांच्या मार्गदर्शनाखाली 27 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शिवसेनेच्या माध्यमातून हा सोहळा बालविकास विद्या मंदिर, मेघवाडी नाका, जोगेश्वरी पूर्व येथे आयोजित केला आहे. यावेळी शिवसेना उपनेते-युवासेना सचिव अमोल कीर्तिकर, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, विधानसभा संघटक शालिनी सावंत, शिक्षक सेना मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवस जनशताब्दी स्मृतिजागर
ग्रंथाली, एनसीपीए, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने साहित्यिक विद्याधर पुंडलिक, जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्याचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्य यावर आधारित ‘जन्मशताब्दी स्मृतिजागर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला संध्याकाळी 4.30 ते 7 या वेळेत हा साहित्योत्सव साजरा केला जाणार आहे. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलावंतांच्या सहभागातून या साहित्यिकांच्या साहित्याचा कलाविष्कार सादर केला जाणार आहे.