पालिकेत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे करणार मराठीचा जागर 

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबई महापालिका मुख्यालयात दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन आणि पंधरवडा’आयोजित करण्यात येतो. यंदा गुरुवार, 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे दुपारी 3 वाजता महापालिका सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका सातत्याने विविध स्तरावर उपक्रम राबवत असते. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्यातील अभ्यासक, विचारवंत, ज्येष्ठ लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, कादंबरीकार आदींचे महापालिकेकडून व्याख्यान आयोजित केले जाते.

महापालिकेच्या वतीने ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरवदेखील या सोहळ्यात करण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या मराठी शब्दकोशाचेही प्रकाशन यानिमित्ताने करण्यात येणार आहे.