हुश्श… अफगाणिस्तान जिंकले एकदाचे ! पराभवासह इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपले

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत अखेर अफगाणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान राखले, मात्र लागोपाठच्या पराभवामुळे इंग्लंडचे आव्हान अखेर संपुष्टात आले. इब्राहिम झदरानच्या 177 धावांच्या विश्वविक्रमी खेळीला अखेर विजयाचा टिळा लागला. अझमतुल्लाह ओमरझाईनेही मोक्याच्या वेळी भन्नाट गोलंदाजी करीत इंग्लंडच्या खशातून सामना खेचून आणला. जो रूटची झुंजार शतकी खेळी व्यर्थ ठरली.

अफगाणिस्तानकडून मिळालेल्या 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 49.5 षटकांत 317 धावांवर संपुष्टात आला. एक वेळ इंग्लंडचा डाव 4 बाद 133 असा संकटात सापडला होता. फिल सॅल्ट (12), जेमी स्मिथ (9) व बेन डकेट (38) या आघाडीच्या फळीला शंभरीच्या आत तंबूत धाडून अफगाणिस्तानने आशा पल्लवीत केल्या होत्या, मात्र त्यानंतर जो रूटने मधल्या फळीतील हॅरी ब्रुक (25), कर्णधार जोस बटलर (38), जेमी ओव्हरटन (32) यांना हाताशी धरून इंग्लंडला विजयाच्या दारात आणले. रूटने 111 चेंडूंत 11 चौकार व एका षटकारासह 120 धावांची खेळी केली, मात्र विजयासाठी 39 धावांची गरज असताना रूट बाद झाला. त्याला अझमतुल्लाह ओमरझाईने यष्टीमागे गुरबाझकरवी झेलबाद केले. त्यानंतर हळूहळू सामनाही इंग्लंडच्या हातातून निसटत गेला. अफगाणिस्ताकडून अझमतुल्लाह ओमरझाईने सर्वाधिक 5 विकेट टिपल्या. मोहम्मद नबीला 2, तर फझलहक फारुखी, राशीद खान व गुलबदीन नबी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

झदरानने मोडला डकेटचा विक्रम

अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झदरानने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 177 धावांची खेळी करीत नवा विश्वविक्रम केला. इंग्लंडविरूद्ध ही संस्मरणीय खेळी करताना झदरानने इंग्लंडच्या बेन डकेटचा 165 धावांचा पाचच दिवसांपूर्वीचा विक्रम आज मोडीत काढला.

जोफ्रा आर्चरचा धमाका

त्याआधी, नाणेफेकीचा कल जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 7 बाद 325 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली, मात्र जोफ्रा आर्चरने अफगाणिस्तानची आघाडीची फळी कापून काढत इंग्लंडला सनसनाटी सुरुवात करून दिली होती. त्याने पाचव्या षटकात रहमानुल्लाह गुरबाजचा (6) त्रिफळा उडविला, तर त्याच्या जागेवर आलेला सेदिकुल्लाह अटल (4) याला पायचीत पकडले. मग आर्चरने नवव्या षटकांत रहमत शाहला (4) आदिल राशीदकरवी झेलबाद करून अफगाणिस्तानची 3 बाद 98 अशी दुर्दशा केली.