आभाळमाया – ग्रहदर्शन पर्वणी!

‘सायंकाळची शोभा’ या बालकवींच्या निसर्ग कवितेत मावळतीच्या सूर्याचे अप्रतिम वर्णन आहे. शेवटी ‘कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा’ असं आश्चर्य व्यक्त करीत कविता संपते.

खगोल अभ्यासकांच्या दृष्टीने मात्र ‘सोन्याचा गोळा’ पश्चिम क्षितिजाखाली गेल्यानंतरच तारांगण अवतरते. पश्चिम क्षितिजाकडे नजर लावली की, मावळतीचे तारे आणि क्रमाक्रमाने एकेक तारकासमूह मावळतीकडे सरकताना दिसतात. पूर्व ते पश्चिम क्षितिजापर्यंत आकाश ‘मोकळं’ असेल म्हणजे मध्ये उंच झाडं, डोंगर किंवा इमारती नसतील, आकाशात चंद्रप्रकाश, धुरकं तसंच प्रकाश प्रदूषण नसेल तर तारांगण खऱ्या अर्थाने ताऱ्यांची जत्रा दाखवू शकतं. गेल्या आठवड्यात पुण्याहून ट्रेनने संध्याकाळी परतताना खंडाळ्याचा घाट ओलांडल्यावर दिसणाऱ्या दरीतल्या निबीड अंधारात सटकन पृथ्वीकडे झेपावणाऱ्या दोन तेजस्वी उल्का दिसल्या. दूरच्या प्रवासात रात्रीच्या वेळी खिडकीतली जागा मिळाली तर ट्रेनसारखा आकाशदर्शन घडवणारा प्रवास नाही. त्याचा अनुभव अनेकदा घेतलाय.

विख्यात लोकसाहित्यिका डॉ. सरोजिनी बाबर यांनाही खोपोलीजवळच्या घाटात तारकासमूहातला चंद्र दिसला आणि त्यांना लोकसाहित्यातले शब्द आठवले… ‘सूपभर लाह्या, त्यात एक रुपया’. खेडोपाड्यांतल्या मंडळींचं निसर्गाशी नातं शहरी माणसांपेक्षा अधिक असतं. म्हणूनच आम्हाला ‘आकाशदर्शन’ करण्यासाठी मुंबईपासून शंभरेक किलोमीटर अंतरावरची काळोखी जागा शोधावी लागते.जानेवारीच्या 3-4 तारखेला ‘कॉन्ट्रॉस्टीड’ (भूतप) उल्का वर्षाव होता. त्यातल्याच काही उल्का प्रवासात असताना दिसल्या. उल्का वर्षाव पाहायचा तर सभोवती दाट काळोख हवा, परंतु तेजस्वी ग्रहदर्शन करण्यासाठी त्याची गरज नाही. गेल्या 7 तारखेला सायंकाळच्या आकाशात बुध, गुरू, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून वगैरे आणि काही वेळाने मंगळही दिसत होता. यापैकी बुधदर्शन फारच कठीण. कारण तो सूर्यसान्निध्यात असल्याने फारच लवकर मावळतो. शक्तिशाली दुर्बिणीतून या क्षितिजाजवळच्या अंतर्ग्रहाचं दर्शन शक्य असतं.

शुक्र हा तेजस्वी ग्रहसुद्धा अंतर्ग्रह, म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मधल्या कक्षेत आहे. त्यावरच सल्फर आणि् कार्बनच्या ढगांचं वातावरण सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित करत असल्यामुळे तो गुरूपेक्षा बराच लहान असूनही नुसत्या डोळ्यांनी अधिक तेजस्वी वाटतो. शुक्र-पृथ्वी अंतर सुमारे 7 कोटी किलोमीटर आहे, परंतु शुक्र सध्या त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरताना सूर्यापासून लांब गेल्याने पृथ्वीवरून जवळ आणि त्यामुळेच अधिक तेजस्वी भासतोय. बुधाच्या तुलनेत शुक्राचं पश्चिम (किंवा पूर्व) क्षितिजावर येणं बरंच जास्त म्हणजे सुमारे 47 अंशांपर्यंत असतं. डोक्यावरचे तारे 90 अंशांवर असतात. या तुलनेत शुक्र जवळपास निम्म्या अंतरावर येतो. बुध फार फार तर 20 अंश इतकाच क्षितिजावर दिसतो.

त्यातही शुक्र खूपच तेजस्वी असल्याने दुर्बिणीतून तर त्याची चंद्रकोरीसारखी ‘कोर’ही दिसते. ‘शुक्रतारा’ किंवा ‘शुक्राची चांदणी’ हे आपल्या समजुतीमधले किंवा काव्यातले शब्द. शुक्र ‘तारा’ नाही, तो स्वतः प्रकाश देत नाही. पृथ्वीसारखाच तो परप्रकाशित ग्रह. मात्र त्याचा ‘अल्बिडो’ किंवा प्रकाश परावर्तन क्षमता पृथ्वीच्या अनेक पट किंवा 70 टक्के इतकी आहे. साहजिकच तो छान दिसतो. आकाराने पृथ्वीच्या अकरा पट व्यास असलेला गुरू हा संपूर्ण ग्रहमालेतील बलाढ्य ग्रह. तो पृथ्वीपासून सुमारे 75 कोटी किलोमीटर अंतरावर असला तरी त्याच्या विशाल देहामुळे तो तेजस्वी दिसतो. दुर्बिणीतून तर त्याच्या मध्यभागी असलेले पट्टे आणि क्वचित ‘ग्रेट रेड स्पॉट’सुद्धा दिसतो. तसंच युरोपा, गॅनिमिड, आयो आणि कोलेस्टा हे त्याचे चार चंद्रही दिसतात.

शनीच्या कड्यांची माहिती गॅलिलिओपासून आजतागायत सर्वांनीच जाणली. दुर्बिणीतून ही कडी स्पष्ट दिसतात. शक्तिशाली दुर्बिणीतून तर दोन कड्यांमधली ‘कॅसिनी गॅप’ही दिसते! शनिदर्शन खूपच विलोभनीय  वाटतं. गेल्या 40-45 वर्षांत अनेकदा या ग्रहांचा दुर्बिणीतून वेध घेतलाय, पण प्रत्येक वेळी तोच आनंद मिळतो. निसर्गाची हीच तर किमया आहे. रोजचा उगवता सूर्य ‘ताजा’च वाटतो आणि आपल्याला ताजंतवानं करतो. तसंच आकाशस्थ ग्रह-ताऱ्यांचंही.

हा छंद केवळ गंमत नव्हे. त्यामध्येच आपल्या अस्तित्वाचं इंगित दडलेलं आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धात आकाशात सर्व सातही ग्रह सूर्याच्या एका बाजूला दिसले, पण शनी आता मावळतोय. तो आता मार्चमध्ये पूर्व दिशेला सकाळी दिसेल. गेल्या 7 तारखेलाही 3-4 आलेच होते. लालसर मंगळही दिसत होता. अजूनही महिना, दोन महिने ही ‘सायंकाळची अवकाश शोभा’ पाहायला मिळणार आहे. पृथ्वीवरची पर्यटनस्थळं पाहाया पैसा लागतो. अवकाश दर्शन निःशुल्क आहे. तशी ‘नजर’ मात्र हवी.

आणखी एक. सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला आले म्हणून बावचळून जाण्याचं कारण नाही. कारण सर्व ग्रहांचं एकत्रित वजन दोन टक्के, तर एकट्या सूर्याचं वजन 98 टक्के आहे. म्हणजे तराजूच्या एका पारड्यात एक किलोचं वजन आणि दुसऱ्या पारड्यात दोन खिळे व पाच-सात टाचण्या टाकण्यासारखा प्रकार. तेव्हा सर्व ग्रह कायमचे सूर्याच्या एका बाजूला एकवटले तरी काही फरक पडत नाही. एक छान खगोलीय अनुभव मात्र मिळतो. तेव्हा ही संधी सोडू नका. मान वर करून आकाशीची दौलत नजरेत साठवण्याचा प्रयत्न करा. ती निःसंशय उत्साह वाढवेल.

[email protected]