लेख – धन्यता नको, प्रयत्न हवा!

>> प्रवीण धोपट 

आता कोणत्याही व्यवहारात मराठीचा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर येतो. मराठी भाषिकालाही मराठीपेक्षा इंग्रजी पर्याय अधिक सुसह्य वाटायला लागले आणि तेच अंगवळणी पडत गेले. मराठीचा व्यवहारातला वापर कमी कमी होत गेला. सरकारी-खासगी कागदपत्रे, अर्ज, दुकानावरच्या पाट्या, खाद्यपदार्थांच्या याद्या, त्यांची नावे यांना इंग्रजीची सवय होत गेली आहे.

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः

जगात मराठी भाषेचा पंधरावा क्रमांक लागतो, तर भारतात तिचे स्थान तिसऱ्या क्रमांकाचे आहे. तरीही ती जिवंत राहील की मरेल, याची चर्चा अधूनमधून कानावर येत राहते. भाषेचा अभिमान बाळगणे, भाषेविषयी अस्मिता असणे आणि भाषेच्या अस्तित्वाविषयी झगडत राहणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. यासाठी इतिहास, प्रतीके, परंपरा आणि संस्काराचा आधार घेत घेत त्याची उजळणी करीत राहणे आवश्यक आहेच. जी अधूनमधून काही सण, समारंभ, उत्सवातून घडत असतानाही दिसते. त्यानिमित्ताने मराठीची अस्मिता प्रखर होते व तेजाळते, पण काही क्षणांनंतर दुर्दैवाने पुन्हा ती निवळते, विझते किंवा काही प्रमाणात लुप्तही होते असे वाटते. असे का होत असावे याचा विचार केल्यावर प्रमुख तीन कारणे समोर येतात. एक व्यवहार, दुसरे शिक्षण आणि तिसरे साहित्य.

तत्वतः महाराष्ट्रात मराठी ही प्रमुख भाषा असायला हवी. तिच्याशिवाय दुसरा पर्यायच नसता तर तिच्याशिवाय लोकांचे व्यवहार अडले असते किंवा ती त्यांनी परिश्रमपूर्वक शिपून घेतली असती, पण तसे झाले नाही. आता कोणत्याही व्यवहारात मराठीचा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर येतो. मराठी भाषिकालाही मराठीपेक्षा इंग्रजी पर्याय अधिक सुसह्य वाटायला लागले आणि तेच अंगवळणी पडत गेले. मराठीचा व्यवहारातला वापर कमी कमी होत गेला. सरकारी-खासगी कागदपत्रे, अर्ज, दुकानावरच्या पाट्या, खाद्यपदार्थांच्या याद्या, त्यांची नावे यांना इंग्रजीची सवय होत गेली. सहज बोलतानाही माणूस हिंदी, इंग्रजीचा वापर सर्रास करू लागला आणि आपली सोय होतेय ना, आपली गरज भागतेय ना इतका साधासुधा विचार करून माणूस वेळ निभावून नेऊ लागला. महाराष्ट्रात मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे हे सांगायला आता कुठल्याच आकडेवारीची गरज नाही. मराठीपेक्षा इंग्रजी शाळा थोर हा विचार आता मराठी घराघरात रुजला आहे.

गेल्या वीस-बावीस वर्षांतला हा आलेख चढता आहे. जर प्राथमिक शिक्षणाची भाषाच परकी असेल तर अशा मुलांकडून का आणि कोणती अपेक्षा करावी? महाराष्ट्राच्या राजधानीत केवळ मराठी साहित्याची पुस्तके विक्री करणारी दुकाने एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत आणि ती मुंबईच्या टॉप टेन यादीत नाहीत. वाचनालय आहेत, पण तिथे वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, यातच सर्व येते.

माणसाची बोली भाषेला जिवंत ठेवते

भाषा जैविक असते. माणसाची बोली तिला जिवंत ठेवते. तिच्या तोडक्या-मोडक्या वापरानेही ती बहरते. ती चूक, बरोबर पोटात घेते पण वाढत राहते. भाषा प्रवाही असते. तिला माणसांचा आधार लागतो. ती फार काळ केवळ पुस्तकांच्या बंद पानाआड जिवंत राहू शकत नाही. तिला हलतं, बोलतं ठेवावं लागतं. आपण जर तिला व्यवहारातून, शाळेतून आणि साहित्यातून घालवली तर ती हातची जाईल ही भीती आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यामागे तिचे अडीच हजार वय असणे हे एक प्रमुख कारण आहे. एका अर्थाने तिच्या उपयुक्ततेपेक्षाही तिचे म्हातारपण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. केवळ म्हातारी आहे म्हणून पूजनीय, वंदनीय असणे यात धन्यता मानायची की तिच्या सर्वांगसुंदर वाढीसाठी प्रयत्न करायचे, हा खरा प्रश्न आहे.