लेख – मराठीचा आपण खरोखरच गौरव करतो का?

>> डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी 

भाषाविषयक असे नेमके काय करायला हवे, याचा साधा विचारही आपण करत नाही. याचे मूळ कारण म्हणजे भाषा शिक्षणच आपल्याला कधी दिले जात नाही. भाषेच्या नावावर केवळ साहित्य शिकवले जाते. विद्यापीठांच्या मराठी विभागांमधून, महाविद्यालयांमधील मराठी विभागातून दिले जाते ते मराठी भाषा शिक्षण नसते, ते केवळ मराठी साहित्याचे शिक्षण असते.

मराठीचा गौरव नुसताच जपायचा, साजरा करायचा की वाढवायचा? यातील नेमके काय करायचे? की या तिन्ही गोष्टी करायच्या? कशा? कोणी? आपण स्वतः नेमके काय करायचे? हे आणि असे प्रश्न आपण मराठी गौरव दिनानिमित्त कधी उपस्थित करतो का? सरकार परिपत्रक काढते म्हणून सरकारच्या संबंधित संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, विभागीय साहित्य संस्था, ग्रंथालये, शाळा अशा ठिकाणी त्या परिपत्रकामुळे व त्यात वर्णन केल्यानुसार हा दिवस साजरा होतो. म्हणजे काय होते? तर त्याच त्या लेखकांच्या त्याच त्या साहित्याची त्याच त्या लोकांकडून अभिवाचने, कुठे कवी संमेलने, कुठे साहित्यावर परिसंवाद पार पडतात.

मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी टिकाऊ स्वरूपाचे आपण किंवा आपले शासन नेमके काय करते? दिवस कशाचाही असो तो फक्त ‘साजरा’ करणे एवढेच फक्त आपल्याला ठाऊक असते. 21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी असा सात दिवस मराठी मातृभाषा आठवडा. म्हणजे मराठीच्या विविध बोलींभाषासहित मराठीची वाङ्मयीन, उपयोजित अशी सर्व रूपे, मराठीचे सांस्कृतिक संचित, त्यांचे भूत, भविष्य, वर्तमान या साऱ्या अंगांनी भाषाविषयक असे नेमके काय करायला हवे, याचा साधा विचारही आपण करत नाही. याचे मूळ कारण म्हणजे भाषा शिक्षणच आपल्याला कधी दिले जात नाही. भाषेच्या नावावर केवळ साहित्य शिकवले जाते. विद्यापीठांच्या मराठी विभागांमधून, महाविद्यालयांमधील मराठी विभागातून दिले जाते ते मराठी भाषा शिक्षण नसते, ते केवळ मराठी साहित्याचे शिक्षण असते. ते मराठी भाषा विभाग नसतात, ते मराठी साहित्य विभाग असतात. या विभागांची नावे बदलून अगोदर मराठी साहित्य विभाग करणारा शासन निर्णय शासनाने यंदाच्या मराठी गौरव दिनानिमित्त काढला पाहिजे.

हे राज्य स्थापन होऊन त्रेसष्ट वर्षे झाली तरीही केंद्रात जसा स्वतंत्र राजभाषा विभाग आहे, तसा महाराष्ट्र शासनाचा स्वतंत्र मराठी राजभाषा विभागच अद्याप नाही. जो मराठी भाषा विभाग आहे त्याला स्वतःचे स्वतंत्र असे कोणतेच काम नाही. राजभाषा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी त्यामुळे स्वतंत्र यंत्रणाच महाराष्ट्रात नाही. सरकार नुसती परिपत्रके काढून मोकळे होते. मराठी भाषेचा गौरव करणे म्हणजे काय आणि तो करण्यासाठी नेमके वेगळे काय करायचे, यावर कधी तरी एकदा चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी. गावागावातून त्यावर सूचना यायला हव्यात. मराठी भाषेचा प्राचीन काळापासून तो आजवरचा गौरव वाढवणाऱ्या विविध कालखंडांतील भाषिक इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे कोणते, त्या त्या कालखंडात मराठी भाषेने केलेले केवळ साहित्याने नव्हे, गौरवास्पद कार्य कोणते याचा धांडोळा घ्यायला हवा. हे सर्व करण्याचे टाळणे म्हणजे मराठी भाषा गौरव दिवस साजरा करणे का? मराठी संस्कृतीचा, भाषेचा, केवळ साहित्याचा नव्हे, गौरव वाढवणाऱ्या बाबी कोणत्या हे मराठी भाषिक समाजाला ठाऊक करून देण्यासाठी ना शासन गौरवदिनी उपक्रमांतून प्रयत्न करते, ना अशासकीय संस्था. भाषेचा एखादा दिन साजरा करणे म्हणजे केवळ उत्सव साजरा करणे. मनोरंजक, करमणूकप्रधान, टाळ्या पिटण्याजोगे, मानधन, पुरस्कार वितरण सोहळे करण्यापुरते, मंत्री व राजकारणी यांच्या भोवती घोटाळण्याच्या संधी शोधण्यापुरते, गर्दी जमवून दिखाऊ स्वरूपाचे तेवढे काही करून दाखवणे नव्हे. मराठी भाषेसाठी टिकाऊ स्वरूपाचे आपण काय करतो हा प्रश्नही त्यानिमित्ताने उपस्थित करणेदेखील मराठीचा गौरव करणेच आहे.