आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी नेत्यांनी नवी रणनीती आखली आहे. आता 16 डिसेंबरला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं शेतकरी नेते सर्वनसिंह पंधेर यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत रेल रोको करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, आंदोलक शेतकरी जेव्हा दिल्लीकडे कूच करतील तेव्हा हरियाणातील शेतकरी आणि महिलाही तिथे असतील.
पंधेर म्हणाले की, आम्ही सर्व घटकांना आवाहन करतो की, उठा. 3 कोटी पंजाबींनी सर्वत्र रेल्वे अडवावी, असं आवाहनही आम्ही केलं आहे. जिथे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे फाटक आहे, तिथे रेल्वे गाड्या अडवाव्या. आपल्या देशात 50 टक्के लोक शेतीत गुंतलेले आहेत, त्यांचा आवाज दाबता येणार नाही. शेतकरी नेते जगजित सिंग खनौरी सीमेवर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची ढासळलेली प्रकृती सर्वांसमोर आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.