संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अटक झाल्यानंतर अल्लू अर्जुनची शनिवारी सकाळी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. कारागृहातून सुटका झाल्यानंतर अल्लू अर्जुनने आपल्याला समर्थन देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. केवळ चाहत्यांनीच नाही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही अल्लू अर्जुनला पाठिंबा दर्शवला आहे.
तुरुंगातून बाहेर येताच अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी घरी कलाकारांची रीघ लागली आहे. अभिनेता विजय देवरकोंडासह अनेक कलाकारांनी अल्लू अर्जुनची भेट घेतली. यावेळी मीडियाशी संवाद साधताना आपण 100 टक्के अल्लू अर्जुनसोबत असल्याचे विजयने सांगितले.
विजयव्यतिरिक्त अभिनेता राणा दग्गुबती, नागा चैतन्य, सुपरस्टार चिरंजीवी यांच्या पत्नी सुरेखा यांनी अल्लू अर्जुनची भेट घेतली. ‘पुष्पा 2’चे दिग्दर्शक सुकुमार यांनीही अल्लू अर्जुनच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.
तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनने मीडियाशी संवाद साधला. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडलेल्या घटनेमुळे मी दु:खी आहे. पीडित कुटुंबाला शक्य ती सर्वतोपरी मदत करेन, असे आश्वासन देत या घटनेशी आपला थेट संबंध नसल्याचेही त्याने सांगितले. हे निव्वळ अपघाताने आणि अनावधानाने घडल्याचे त्याने स्पष्ट केले.