आरोग्य विभागाकडून हेळसांड; कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीत फरशीवर झोपवलं

आरोग्य विभागाकडून रुग्णांची हेळसांड सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उघडकीस आला आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीमध्ये फरशीवर झोपवण्यात आहे. रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने महिलांना फरशीवर झोपवण्याची वेळ आली. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी 43 महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली. मात्र शस्त्रक्रियेनंतर महिलांना आराम करण्यासाठी खाटाच उपलब्ध नव्हत्या. यामुळे भर थंडीमध्ये महिलांना फरशीवर गादी टाकून झोपवण्यात आले.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले. संबंधित रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.