कोरेगाव-भीमा लढाई शौर्यदिनी 1 जानेवारी 2025 रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे नियोजन करता यावे यासाठी येथील जागेचा तात्पुरता ताबा घेण्यास उच्च न्यायालयाने पुणे जिल्हाधिकारी यांना परवानगी दिली आहे.
विजयस्तंभ असलेल्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने या जागेची स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शौर्य दिनाचे नियोजन करण्यासाठी 2018 पासून पुणे जिल्हाधिकारी न्यायालयाकडे परवानगी मागत आहेत. या वर्षीदेखील पुणे जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात अर्ज केला होता.
न्या. एम. एस. मोडक यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. शौर्य दिनाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी विजयस्तंभाजवळ येतात. त्यांचे नियोजन करण्यासाठी 22 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 पर्यंत या जागेचा ताबा द्यावा, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. या जागेचे मूळ दावेदार माळवदकर कुटुंबीयांनी या अर्जाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. या जागेतील शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची मागणी माळवदकर कुटुंबीय करणार नाहीत, असे वरिष्ठ वकील राम आपटे यांनी स्पष्ट केले. त्याची नोंद न्यायालयाने घेतली.