संविधानाची विटंबना करणारा माथेफिरू हा घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला. या माथेफिरूने संविधानाची विटंबना केल्याबद्दल माफीही मागितली.
मंगळवारी सायंकाळी दत्ता सोपान पवार या माथेफिरूने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली होती. या घटनेवरून दोन दिवस परभणी शहर धुमसत होते. जिल्हाधिकाऱ्यांचे शांततेचे आवाहन धुडकावून जमावाने शहरात दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्यांनाही निशाणा बनवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड झाली.
जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या दत्ता पवार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. आज काही भीमसैनिकांनी रुग्णालयात जाऊन त्याला कडक शब्दांत समज दिली तसेच संविधानाचे महत्त्वही समजावून सांगितले. या वेळी दत्ता पवार याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत झाल्या घटनेबद्दल माफी मागितली.
परभणी येथील संविधान विटंबनेचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटत असून, शुक्रवारी पूनम गेटजवळ गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत युवाभीम सेनेने निषेध केला. तर याप्रकरणी आठ जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
परभणी येथे संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकावर लाठीचार्ज करण्यात आला असून, त्याचे पडसाद सोलापूर शहर व जिल्ह्यात उमटत आहेत. जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर युवाभीम सैनिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत निषेध केला. तसेच, गुन्हेगारांना शिक्षा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महेश डोलारे यांनी दिला.