Mumbai crime news – डीजेच्या लाईटमध्ये लपवले होते सोने, डीआरआय केला पर्दाफाश

डीजे लाईटच्या आत सोने लपवून तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला. डीआरआयने कारवाई करून 12 किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 9.6 कोटी रुपये आहे. डीआरआयने या आठवडय़ात कारवाई करून एकूण 48 किलो सोने जप्त केले.

गेल्या काही दिवसांपासून हवाईमार्गे सोने तस्करीचे प्रकार वाढू लागले आहेत. परदेशातील तस्कर हे पॅरिअरचा वापर करून विविध प्रकारे सोने तस्करी करत आहेत. अशा तस्करांना संबंधित यंत्रणा कारवाई करून दणका देत आहेत.

एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये डीजे लाईट्समधून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. त्यानंतर डीआरआयचे पथक एअर कार्गो येथे गेले. एअर कार्गोमधील गोदामांची तपासणी केली. तेव्हा 68  डी.जे.च्या लाईट्स दिसल्या. त्या लाईट्सची तपासणी केल्यावर त्याच्या आत सोने आढळले. डीआरआयने 12 किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 9.6 कोटी रुपये इतकी आहे.

सोने तस्करीप्रकरणी दोघांचा सहभाग आढळल्याने त्याचा डीआरआयने जबाब नोंदवला. गुन्हा नोंद होताच त्या दोघांना डीआरआयने अटक केली. ते सोने कोणाला देणार होते  याचा तपास डीआरआय करत आहे.