अजिंक्यच्या झंझावातापुढे बडोदा ध्वस्त; मुंबई अंतिम फेरीत, आता गाठ मध्य प्रदेशशी

अजिंक्य रहाणेच्या झंझावाताने बडोद्याचे आव्हानही उद्ध्वस्त केले आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अक्षरशः विजेत्याच्या थाटात प्रवेश केला. आता त्यांची गाठ उपांत्य फेरीत दिल्लीचा सहज पराभव करणाऱ्या मध्य प्रदेशशी पडेल.

हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेटचा संयमी फलंदाज म्हणून लौकिक असलेल्या अजिंक्य रहाणेच्या बॅटने पुन्हा एकदा आपले रौद्र रुप क्रिकेट विश्वाला दाखवले. मध्य प्रदेशच्या 159 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉच्या रुपाने मुंबईला पुन्हा एकदा हादरा बसला. मात्र त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने त्याने 88 धावांची भागी रचत या सामन्यातील सारी हवाच काढून टाकली. अजिंक्यने मध्य प्रदेशच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने चौकार-षटकारांची बरसात करत शतकाच्या दिशेने झेप घेतली. पण शतकापासून अवघ्या दोन धावा दूर असताना तो बाद झाला आणि त्याचे या मालिकेत तिसऱयांदा शतक हुकले. या स्पर्धेत सर्वाधिक पाच अर्धशतके आणि सर्वाधिक 432 धावा काढत तो अव्वल स्थानावर विराजमान आहे. या स्पर्धेतील सात डावात त्याने आतापर्यंत 98, 84, 96, 22, 68, 52, 11 अशा खेळ्या केल्या आहेत. अजिंक्यने या वादळी खेळींमुळे आगामी आयपीएलमध्ये कोलकात्या संघाच्या कर्णधारपदासाठी आपला दावा पेश केला आहे.

बडोद्याकडून निराशा

या मालिकेत बडोद्यानेही जबरदस्त खेळ केला होता. त्यामुळे आज उपांत्य सामनाही रंगतदार होण्याची शक्यता होती. पण बडोद्याचा एकही फलंदाज तिशीच्या पुढे जाऊ शकला नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी एक टीम म्हणून गोलंदाजी करत बडोद्याच्या फलंदाजांना 158 धावांपर्यंत रोखत अर्धी लढाई जिंकली आणि त्यानंतर अर्धी लढाई अजिंक्यच्या आक्रमणाने जिंकून दिली. बडोद्याच्या डावात शाश्वत रावत (33), कृणाल पंडय़ा (30), शिवलीक शर्मा (ना. 36) आणि अतित शेठ (22) यांनाच दोनअंकी खेळी करता आली. मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी विकेट टिपल्या, फक्त सूर्यांशने दोन विकेट मिळवल्या.

दिल्लीचा धुव्वा

बंगळुरू ः कर्णधार रजत पाटीदारच्या 29 चेंडूंतील 66 धावांच्या खेळीने दिल्लीचा धुव्वा उडवला आणि मध्य प्रदेशने 26 चेंडू आणि 7 विकेट राखून अंतिम फेरी गाठली. मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजी दिली आणि त्यांच्या एकाही फलंदाजाला खुलेपणाने खेळू दिले नाही. फक्त अनुज रावतने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. परिणामी दिल्लीचा संघ 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यानंतर मध्य प्रदेशचा सलामीवीर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र त्यानंतर हर्ष गवळीने 30 धावा करत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. पण 46 धावांत मध्य प्रदेशने गवळीला गमावले आणि त्यानंतर हरप्रीत सिंग आणि रजत पाटीदारने दिल्लीच्या गोलंदाजांना फोडून काढत दहा षटकांत 106 धावांची अभेद्य भागी रचत अंतिम फेरी गाठली.