बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हल्ले होत आहेत. मंदिरे जाळली जात आहेत, तरी आपले विश्वगुरू गप्प का? असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला. एका फोनवर युक्रेन युद्ध थांबवणारे विश्वगुरू नरेंद्र मोदी हिंदूंवरील अत्याचार का थांबवत नाहीत? असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी बांगलादेशातील परिस्थिती आणि मुंबईतील दादर येथील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटिसीवरून केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, संसद अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालू आहे असे म्हणतात, पण बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विषयाला बगल दिली जात आहे. बांगलादेशात हिंदूंवर वारंवार हल्ले होत आहेत. इस्कॉनचे मंदिर जाळले गेले. तेथील इस्कॉनच्या प्रमुखांना अटक झाली, तरीसुद्धा केंद्र सरकार का गप्प आहे? आपले विश्वगुरू हे अत्याचार पाहत का बसले आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका फोनवर युक्रेनचे युद्ध थांबवले होते. तसे आता बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारही थांबवावेत, अशी माझी तमाम हिंदूंच्या वतीने विनंती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना इथे केवळ बटेंगे, कटेंगे, फटेंगे, कटेंगे असे करून काही उपयोग नाही. नको तिथे छाती फुगवून दाखवण्यात अर्थ नाही. जिथे अत्याचार होताहेत तिथे आपली धमक दाखवायला हवी, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मोदींना मणिपूरसारखे बांगलादेशातील अत्याचार दिसत नसावेत
शिवसेनेच्या खासदारांना भेट नाकारल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शिवसेनेच्या खासदारांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली. बांगलादेशच्या मुद्द्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा म्हणून पंतप्रधानांना भेटून शिवसेनेच्या वतीने रीतसर पत्र दिले जाणार होते, पण पंतप्रधान मोदींचे व्याप खूप आहेत. त्यांना जगभर फिरायचे असते, भाषणे द्यायची असतात. मणिपूरमध्ये होणाऱ्या अत्याचारांप्रमाणे कदाचित त्यांना बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार लक्षात आले नसतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दोन-तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ इथे आला होता. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळणे कितपत योग्य आहे, असा मुद्दा तेव्हा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता. परंतु सत्ताधारी पक्षाकडून काहीच उत्तर मिळाले नाही, याकडेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले.
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल मोदी सरकारची काय भूमिका आहे, सरकार काय पावले उचलणार आहे हे स्पष्ट झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना हिंदुस्थानात आल्या, त्या कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही, परंतु तिथे थांबलेल्या गोरगरीब हिंदूंना मात्र अत्याचार सहन करावे लागत आहेत, असेही ते म्हणाले.
‘एक है तो सेफ है’ म्हणणाऱ्या मोदी राजवटीत हिंदूंची मंदिरे सेफ नाहीत, असा घणाघात या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपचे हिंदुत्व साफ झूठ आहे. फक्त पक्षाचा व सत्तेचा विस्तार हेच भाजपचे स्वप्न आहे का? त्यासाठी हिंदूंचा वापर करताय का? असा खणखणीत सवाल करतानाच, जगातील हिंदू मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेसुध्दा या वेळी उपस्थित होते. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे करताना भाजप मुंबईतील रामभक्त हनुमानाचे मंदिर तोडतेय, अशी टीका त्यांनी केली.
नवी मुंबईत मंदिरांच्या नावावर असणारे भूखंड सिडकोच्या माध्यमातून बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. त्यासंदर्भातील वर्तमानपत्रांतील बातमीचाही दाखला उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला. सध्या कोणाच्या घशात भूखंड घातले जात आहेत हे सांगायला नको, असे म्हणत त्यांनी उद्योगपती अदानींचा अनुल्लेखाने वेध घेतला.
भाजपचे हिंदुत्व फक्त मतांपुरते बाकी आहे
मंदिर वाचवण्याबाबत शिवसेनेची भूमिका काय, रेल्वे प्रशासनाला काय इशारा द्याल? असा प्रश्न या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनेने फक्त काय इशारे देत राहायचे? ‘ईव्हीएम’द्वारे भाजपने इलेक्शन जिंकलेय. अधिकार त्यांना मिळालेत. मग एवढेच असेल तर सत्तेवर का बसलात? हिंदुत्व फक्त मतांपुरते बाकी आहे का? मग कसले कटेंगे बटेंगे करताय? हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्यांनी आता हिंदूंची मंदिरे वाचवण्यासाठी काय करणार याचे उत्तर द्यावे, त्यानंतर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दादरचे 80 वर्षे जुने हनुमान मंदिर तोडण्याचा रेल्वेने फतवा काढूनही फडणवीस गप्प का?
हिंदू म्हणजे केवळ मते नाहीत. हिंदूंना भावना आहेत. भाजपसाठी निवडणुकीपुरतेच हिंदू बाकी आहेत का? हिंदू फक्त मतांपुरतेच आहेत का? हिंदूंना भयभीत करायचे, त्यांना घाबरवायचे, हिंदूंची मते घ्यायची आणि सत्तेवर आल्यानंतर स्वतःच हिंदूंची मंदिरे पाडायची. हेच तुमचे हिंदुत्व आहे का?
शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करता, बटेंगे तो कटेंगे म्हणता, मग बांगलादेशात हिंदू कापले जाताहेत त्यांना वाचवण्यासाठी काय करणार सांगा? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होताहेत. तरीही गप्प बसणाऱ्यांच्या हिंदुत्वाचा आकार-उकार नेमका काय आहे? भाजपचे हिंदुत्व फक्त इलेक्शनपुरते मर्यादित आहे का? आधी हिंदुत्वाचा मुद्दा घ्या, मग वन नेशन इलेक्शन!
बांगलादेशप्रमाणे मुंबईतही मंदिरे सेफ नाहीत
दादर रेल्वे स्थानकालगत हमाल बांधवांनी उभारलेले 80 वर्षे जुने हनुमान मंदिर तोडण्यासाठी मोदी सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्यासंदर्भात दैनिक ‘सामना’मध्ये प्रकाशित वृत्ताचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शरसंधान केले. मुंबईत हिंदूंचे मंदिर पाडण्याचा फतवा निघाला असताना फडणवीसांचे हिंदुत्व काय करतेय? भाजपचे हिंदुत्व काय करतेय? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा आरोप करता, मग आता भाजपने काय सोडलेय? असा सवाल त्यांनी केला. बांगलादेशप्रमाणे मुंबईतही मंदिरे सेफ नाहीत, असे ते म्हणाले.