हिंदुस्थानी एअरफोर्सला मिळणार 12 नवीन ‘सुखोई’, केंद्र सरकारचा एचएएलसोबत 13,500 कोटींचा करार

केंद्र सरकारने 12 सुखोई लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत 13 हजार 500 कोटी रुपयांचा करार केला आहे. ही लढाऊ विमाने हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात दिसणार असून ही लढाऊ विमाने बनवताना 62.5 टक्के भाग हा हिंदुस्थानी असणार आहे. एचएएलच्या नाशिक विभागात हे तयार केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सरकारच्या स्वावलंबी हिंदुस्थान उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात 12 एसयू-30एमकेआय जेट आणि त्यांच्याशी संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी हा करार करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे. एसयू-30एमकेआय ही रशियन विमान निर्माता कंपनी सुखोईने बनवलेली दोन आसनी लांब पल्ल्याची लढाऊ विमाने आहेत. हे आता हिंदुस्थानी हवाई दलासाठी एचएएलच्या परवान्यानुसार तयार केले जातात. 2 सप्टेंबरला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस)ने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून सुखोई-30 एमकेआय विमानासाठी इंजिन खरेदी करण्यास मंजुरी दिली होती.

सुखोई विमानाची वैशिष्ट्ये

  • सुखोई-30 एमकेआय हे रशियन बनावटीचे ट्विन-सीटर इंजिन मल्टिरोल फायटर जेट विमान आहे.
  • 8 हजार किलो शस्त्रास्त्रांसह एक एक्स 30 मिमी जीएसएच तोफा वाहून नेण्यात सक्षम आहे.
  • हिंदुस्थानी हवाई दलाकडे 260 हून जास्त सुखोई-30 एमकेआय आहेत.
  • 2002 पासून सुखोईचा हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला.
  • सुखोई-30 हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत असे एकाच वेळी लक्ष्यांवर हल्ला करण्यात सक्षम आहे.
  • हे विमान सर्वात पॉवरफुल लढाऊ विमानांपैकी एक आहे.
  • सुखोई – 30 एमकेआय 3 हजार किलोमीटरपर्यंत हल्ला करण्यात सक्षम आहे.