राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी ज्या मुलाने गल्ला फोडला, त्याच्या आई-वडिलांनी संपवलं जीवन; EDने त्रास दिल्याचा आरोप

मध्य प्रदेशमध्ये राहणारे उद्योजक मनोज परमार यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी परमार यांच्यावर ईडीची धाड पडली होती. परमार यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवली होती. ईडीने वारंवार त्रास दिल्याने आपण हे पाऊल उचलत आहोत असे परमार यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

राहुल गांधी यांनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली होती, तेव्हा परमार यांच्या मुलाने राहुल गांधी यांना आपल्या गल्ल्यातले जमवलेले पैसे दिले होते. मनोज परमार यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याने मध्य प्रदेशचे राजकारण तापले आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

ही आत्महत्या नसून खून आहे असा आरोप मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी केला आहे. या हत्येसाठी भाजप आणि ईडी जबाबादार असून हा सरकारी खून आहे असेही पटवारी म्हणाले.


परमार यांनी आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतत भाजपमध्ये जाण्यासाठी दबाव आणला. ईडीचे अधिकाऱ्यांनी धमकी दिली की इतके गुन्हे दाखल करू की राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी हे गुन्हे मागे घेता येणार नाही. तसेच काँग्रेसचे काम केले म्हणून मला ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला. त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे असे परमार यांनी लिहून ठेवले आहे.