63 वर्षांच्या आठवणी जाग्या झाल्या, सरस्वती मंदिर शाळेच्या अमृतमहोत्सवाआधी भरला वर्ग

माहीम येथील सरस्वती मंदिर ही शाळा लवकरच अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या अमृत महोत्सवाआधी शाळेत अनोखा वर्ग भरला. यात 1961 ते 2024 च्या बॅचमधील दोन हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आठवणींना उजाळा दिला.

संपूर्ण शाळा, लायब्ररी, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व कॅण्टीन माजी विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले होते. सेल्फी पॉइंटवरसुद्धा गर्दी पाहायला मिळाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, गायन सादर केले.

सकाळी 8.30 वाजल्यापासून माजी विद्यार्थी शाळेत जमले, सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत व प्रार्थनेनंतर प्रत्येक बॅच नेमून दिलेल्या वर्गात जाऊन बसले. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जुन्या काळातील काही शिक्षकसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर कोटणीस यांनी शाळेच्या 74 वर्षांतील वाटचालीबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच 25 जानेवारी  रोजी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘स्मृतिगंध’ या कार्यक्रमाची माहिती दिली.