उद्योगपती गौतम अदानी व अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोसच्या मुद्दय़ावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. राज्यसभेत तर सभागृह नेते व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सभापती जगदीप धनखड यांची बाजू घेत विरोधी पक्षांवरच हल्लाबोल केला. विरोधी पक्ष धनखड यांची टिंगलटवाळी करतो. धनखड यांना ‘चीअर लीडर’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका नड्डा यांनी केल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. परिणामी कामकाज दुपारी बारा, त्यानंतर दुपारी दोन व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभेतही अदानी -सोरोस मुद्दय़ावरून घोषणाबाजी झाली. त्यातच भर पडली ती तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांबद्दल केलेल्या टिपणीची. बॅनर्जी यांनी सिंधियांना ‘लेडी किलर’ अशी उपमा दिल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बॅनर्जी यांना सिंधिया यांची दिलगिरी व्यक्त करण्यास फर्मावले. त्यानंतर सभागृहातला गोंधळ थांबला.
संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज मानवी साखळी तयार करून ‘मोदी- अदानी एक है’च्या घोषणा देत निदर्शने केली.