‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानी संघटनेच्या संभाव्य दहशतवादी कटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी महाराष्ट्र, गुजरातसह देशभरात 19 ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रात भिवंडी, अमरावती व छत्रपती संभाजीनगरमध्ये छापे टाकले आणि ‘जैश-ए-मोहम्मद’च्या संपर्कात राहिलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ‘पाकिस्तान कनेक्शन’ची एनआयएमार्फत कसून चौकशी सुरू आहे.
हिंदुस्थानातील तरुणांना कट्टरपंथीय बनवून दहशतवादी कारवाया घडवण्याचा ‘जैश-ए-मोहम्मद’चा कट आहे. हा कट उधळून लावण्यासाठी एनआयएने मागील दोन महिन्यांपासून छापेमारी सुरू ठेवली आहे. ऑक्टोबरमध्ये देशात 26 ठिकाणी छापे टाकले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी महाराष्ट्र, गुजरात, जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आदी राज्यांतील 19 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्रात भिवंडी, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलेले तिघे संशयित दहशतवादी मागील अनेक महिन्यांपासून एनआयएच्या रडारवर होते. ते ‘जैश-ए-मोहम्मद’च्या सांगण्यावरून दहशतवादी कारवायांत सामील होण्याच्या तयारीत होते, अशी माहिती एनआयएच्या चौकशीत समोर आली आहे.
ऑक्टोबरमध्ये 26 ठिकाणी छापेमारी
एनआयएने ऑक्टोबरमध्येही दहशतवादी संघटनेच्या छुप्या कारवायांविरुद्ध धडक मोहिम हाती घेतली होती. त्यावेळी देशभरात 26 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्या कारवाईत ‘जैश-ए-मोहम्मद’चा सदस्य शेख सुलतान सलाह उद्दीन अयुबी उर्फ अयुबीला पकडले होते. तसेच मोठय़ा प्रमाणावर कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केली होती.
अमरावतीमध्ये बुधवारी ताब्यात घेतलेला तरुण मागील सहा महिन्यांपासून ‘जैश-ए-मोहम्मद’च्या संपका&त होता. रात्री छायानगर परिसरात छापेमारी करून एनआयएच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
भिवंडीच्या खाडीपार येथे कारवाई
दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने भिवंडीच्या खाडीपार या भागात कारवाई करीत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. कामरान अन्सारी (45) असे त्याचे नाव असून एनआयएचे अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्यासोबत आणखी काही जण असल्याचाही संशय व्यक्त केला जात असून त्यादृष्टीने चौकशीची चव्रे फिरू लागली आहेत.
कामरान अन्सारी हा मूळचा मालेगाव येथील आहे. तो खाडीपार या परिसरातील डोंगरकर ट्रस्टच्या मालकीच्या इमारतीत कुटुंबीयांसह राहत होता. कामरान हा मुस्लिम जमातमध्ये नेहमी जात असे. पण नक्की कोणते काम करायचा याबाबत कुणालाच माहिती नाही. एनआयए पथकाने पहाटे छापेमारी करीत अन्सारी याला ताब्यात घेतले. या कारवाईने खोणी परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक निजामपूर पोलिसांकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान गेल्या वर्षी बोरिवली पडघा येथे एनआयएने मोठी कारवाई केली होती. आता तपासाची दिशा भिवंडीलगतच्या खाडीपार येथे जाऊन पोहोचल्याने तर्कवितका&ंना उधाण आले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू केलेल्या छापेमारीत दहशतवादाच्या प्रचार-प्रसारासाठी वापरलेली सामुग्री जप्त केल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱयांनी दिली.